मुंबई : सुमारे ३७० हेक्टर क्षेत्रात पसरलेल्या वांद्रे-कुर्ला संकुलात (बीकेसी) रोजगाराच्या संधी वाढत आहेत. आजच्या घडीला बीकेसी हे मुंबईच्या वित्त, व्यवसाय आणि नवोन्मेषाचे प्रमुख केंद्र झाले आहे. सध्या येथे दररोज सुमारे ६ लाखांहून अधिक जण प्रवास करतात. परिणामी, येथे वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. शीव पूल बंद असल्यामुळे बहुतांश वाहतूक वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) परिसरात वळवण्यात आली आहे. बीकेसी मार्ग हे प्रामुख्याने लहान वाहनांसाठी अनुकूल असल्याने, सध्या ट्रक तसेच अवजड वाहने व मालवाहतूक वाहनांचा प्रवास या मार्गावरून होत असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी बांद्रा-कुर्ला संकुलात रस्ता रुंदीकरणासह एकेरी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे.
एमएमआरडीएने या कामासाठी एक विस्तृत वाहतूक व्यवस्थापन योजना तयार केली आहे. सध्याच्या आणि भविष्यातील संभाव्य प्रवाशांची वाढती संख्या, सध्या सुरू असलेली पायाभूत सुविधा विकासकामे यांचे सखोल विश्लेषण करून ही योजना तयार करण्यात आली आहे. बीकेसी हे सार्वजनिक परिवहन सुविधांच्या माध्यमातून उत्तम प्रकारे जोडले गेले असले तरी तेथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. वांद्रे-कुर्ला जोडरस्त्यावर कलानगर जंक्शनपासून भारत डायमंड बोर्सपर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी होते. शीव उड्डाणपूल वाहतुकीस बंद झाल्यामुळे तेथील परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरण व एकेरी वाहतूक व्यवस्थेचा निर्णय घेण्यात आला आहे. एमएमआरडीएने तयार केलेल्या तपशीलवार वाहतूक व्यवस्थापन योजनेला प्राधिकरणाच्या अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्राधिकरण बैठकीत मंजुरी देण्यात आली. या योजनेअंतर्गत बीकेसीतील कमी प्रमाणात वापरात असलेले सायकल ट्रॅक मार्गिकेत रूपांतरित करण्यात येतील. त्यामुळे रस्त्यांची रुंदी वाढेल. परिणामी, प्रत्येक मार्गिकेची वाहतूक क्षमता ६००–९०० वाहनांनी वाढेल. रस्त्यावरील दिवे, दिशादर्शक, झाडे, बस थांबे आणि सुशोभीकरणासाठी लावलेले घटक पदपथावर हलविण्यात येतील. त्यामुळेही रस्त्याची रुंदी वाढण्यास मदत होईल. वाहनांचे अंतर्गत दळणवळण सुरळीत करण्यासाठी बीकेसी भागात एकेरी वाहतूक व्यवस्था लागू करण्यात येईल. तज्ज्ञांच्या शिफारसी व वाहतुकीचा अभ्यास यांच्याआधारे ही उपाययोजना राबविल्याने वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होईल आणि कोंडी कमी होईल.
एमएमआरडीएच्या या धोरणात्मक योजनेच्या माध्यमातून रस्ता रुंदीकरण व एकेरी वाहतूक व्यवस्था लागू करून आम्ही बीकेसीमधील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करत आहोत. या उपाययोजनांमुळे वाहतूक कोंडी कमी होईल. प्रवासाला लागणारा वेळ कमी होईल आणि प्रवाशांसाठी बीकेसीमधील प्रवास सुकर होईल. बीकेसीचे वाढणारे आर्थिक महत्त्व आणि अभ्यागतांची वाढती संख्या लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली.
सायकल ट्रॅक काढल्याचे फायदे
या उपक्रमाचा भाग म्हणून सायकल ट्रॅक काढून रस्त्याचे रुंदीकरण २ २ लेन वरून ३ ३ लेन करण्यात येईल. म्हणजेच रस्ता रुंदीकरणात सुमारे ५०% वाढ होणार असून गर्दीच्या वेळेतील प्रवासाचा कालावधी २५ मिनिटांवरून १५ मिनिटांपर्यंत कमी होईल. या १० मिनिटांमुळे प्रवासी वेळेत ४०% बचत होणार आहे . त्याचप्रमाणे, सिग्नल किंवा अरुंद जागांवर प्रतीक्षा वेळ १० मिनिटांवरून ७ मिनिटांपर्यंत कमी होईल.