रखडलेली प्रवेशप्रक्रिया सुरू होणार

बारावीची प्रवेश प्रक्रिया यंदापासून ऑनलाइन होणार नसल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र बारावीला प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांची यादी शिक्षण उपसंचालक विभागाला सादर करून विभागाच्या शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट करणे महाविद्यालयांना बंधनकारक असेल. याबाबतचे परिपत्रक नुकतेच मुंबईच्या विभागीय उपसंचालक कार्यालयाने काढले असून बारावीच्या प्रवेशांवर अप्रत्यक्षपणे नियंत्रण आणले आहे. या परिपत्रकामुळे गेले दोन महिने रखडलेली बारावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू होणार आहे.

अकरावीनंतर बारावीला साधारणपणे दोन ते अडीच हजार विद्यार्थी दरवर्षी महाविद्यालय बदलतात. अकरावीप्रमाणे या प्रवेशांमध्येही पारदर्शकता आणण्यासाठी ते ऑनलाइन करण्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या विचाराधीन होते. परंतु अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसोबतच बारावीचे प्रवेश करणे शक्य नाही, हे लक्षात येताच विभागाने हा निर्णय रद्द केला. ऑनलाइन प्रवेश होणार नसले तरी ठरावीक कारण असल्याखेरीज बदलाची परवानगी दिली जाणार नाही आहे. मात्र विद्यार्थ्यांने दिलेल्या कारणातील सत्यता तपासण्याची सध्या कोणतीही यंत्रणा नाही.

अर्थात बारावीला प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांची यादी शिक्षण उपसंचालक विभागाला सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. विभागाच्या शालार्थ प्रणालीमध्ये ही यादी समाविष्ट केली जाणार आहे. प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये अशी सक्त ताकीद परिपत्रकाच्या माध्यमातून महाविद्यालयांना देण्यात आली आहे. याउपर कोणत्या महाविद्यालयांनी जास्तीचे प्रवेश दिल्यास त्या विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेस बसू दिले जाणार नाही, असे पत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे. दरवर्षी दोन ते तीन टक्केच विद्यार्थी बारावीला महाविद्यालय बदलतात. अकरावीसोबत बारावीची प्रवेश प्रक्रिया राबविणे कठीण आहे. ऑनलाइन प्रवेश होणार नसले तरी महाविद्यालय कोणत्या मुलांना प्रवेश देणार आहे, याची तपशीलवार माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाला असेल. तसेच जास्तीचे प्रवेश देणाऱ्या महाविद्यालयांनाही यामुळे नक्कीच चाप बसेल.

मुळातच महाविद्यालयात फार कमी जागा अकरावीनंतर रिक्त होतात. बदलीचे कारण तपासण्याची जबाबदारी महाविद्यालयांची असून त्याबाबतचा अहवाल कार्यालयामध्ये सादर करणे त्यांना सक्तीचे केले आहे.

त्यातून प्रवेश प्रक्रियेतील गैरप्रकार उघडकीस येतील, असे मुंबई विभागाचे शिक्षण उपसंचालक बी.बी. चव्हाण यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

तरच महाविद्यालय बदल

  • सध्याचे महाविद्यालय घरापासून दूर असणे
  • पालकांची बदली होणे
  • वैद्यकीय कारणास्तव घराजवळील महाविद्यालय बदलून घेणे
  • शाखा बदलून मिळणे
  • विद्यार्थ्यांचा राहण्याचा पत्ता बदलणे