मुंबई : खड्डे आणि त्यामुळे होणाऱ्या प्राणघातक अपघातांचा प्रश्न गंभीर बनत असतानाच मुंबईतील आपल्या अखत्यारितील रस्त्यांवर केवळ १४ खड्डे असल्याचा दावा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) गुरुवारी केला. गेल्या तीन महिन्यांमध्ये आमच्या ताब्यातील तीन मुख्य रस्त्यांवरील १,२१६ खड्डे बुजविण्यात आले असून आता केवळ १४ खड्डे शिल्लक असल्याचे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

 सध्या संपूर्ण शहर आणि उपनगरांत खड्डय़ांमुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील तातडीने बुजविण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका, ‘एमएमआरडीए’सह अन्य यंत्रणांना दिले होते. ‘एमएमआरडीए’ने मुंबईतील खड्डे बुजविण्यासाठी अधिकाऱ्यांचे एक विशेष पथक तैनात केले होते. त्यानुसार १९ जुलैपासून मुंबईतील खड्डे बुजविण्यास सुरुवात करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुगतगी महामार्गाच्या देखभालीची संपूर्ण जबाबदारी मुंबई महानगरपालिकेने एमएमआरडीएला दिली आहे. त्यामुळे या दोन महामार्गासह विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून जबाबदारी असलेल्या वांद्रे-कुर्ला संकुलातील खड्डे बुजविण्याचे काम ‘एमएमआरडीए’ने हाती घेतले.

‘एमएमआरडीए’तील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ जुलै ते १७ ऑगस्ट या काळात या तिन्ही रस्त्यांवरील एकूण १,२१६ खड्डे बुजविण्यात आले.

अधिकारी म्हणतात..

शहरातील रस्त्यांवर एकूण १,२३० खड्डे आढळले असून १२१६ खड्डे बुजविण्यात आले. आता केवळ १४ खड्डे बुजविण्याचे काम शिल्लक असून ते प्रगतीपथावर आहे.

नागरिक वेगळेच सांगतात..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘बीकेसी’तील कोणत्याही एका रस्त्यावर फेरफटका मारल्यानंतर १४ पेक्षा अधिक खड्डे दिसतील, असे   ‘पॉटहोल्स वॉरिअर्स फाऊंडेशन’चे म्हणणे आहे. बीकेसीत आणि दोन्ही द्रुतगती मार्गावर मोठय़ा संख्येने खड्डे पडले असून ते तात्काळ बुजविण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.