मुदतीअखेर कर्जमाफीसाठी फक्त ५८ लाख शेतकऱ्यांचे अर्ज * बँकांनी दिलेली कर्जदारांची आकडेवारी संशयास्पद *

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अधिकाऱ्यांची चौकशी होणार

राज्य सरकारने जाहीर केलेल्या पीक कर्जमाफीसाठी शुक्रवारी मुदतीअखेर (२२ सप्टेंबर) ५७ लाख ६८ हजार अर्ज दाखल झाल्याची माहिती सहकार विभागातून देण्यात आली. ही आकडेवारी दुपारी १२ वाजेपर्यंतची आहे. रात्री १२ पर्यंत ऑनलाइन अर्ज भरले जाणार आहेत. तरीही ५८ लाखांपेक्षा जास्त अर्ज असणार नाहीत, मग ८९ लाख कर्जदार शेतकऱ्यांचा आकडा आला कुठून, ३१ लाख कर्जदार शेतकरी गेले कुठे, असे प्रश्न सहकार विभागाला पडले आहेत. कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर याप्रकरणी बँका व संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी होईल, अशी माहिती सूत्राकडून देण्यात आली.

अर्थसंकल्पीय व पावसाळी अशा सलग दोन विधिमंडळ अधिवेशनांत विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला हैराण केले होते. शेतकऱ्यांनीही संपाचे हत्यार उपसल्याने सरकारला कर्जमाफीची घोषणा करावी लागली. राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. दीड लाख रुपयांपर्यंतचे संपूर्ण कर्ज माफ, दीड लाख रुपयांवरील कर्ज फेडल्यास दीड लाखही माफ, नियमित हप्ते भरणाऱ्यांना २५ हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान, अशा प्रकारे कर्जमाफीची योजना जाहीर करण्यात आली.

या कर्जमाफीचा फायदा फक्त शेतकऱ्यालाच मिळाला पाहिजे, यासाठी ऑनलाइन अर्ज दाखल करणे बंधनकारक करण्यात आले. त्यावरही विरोधी पक्षांनी टीका केली होती. १ ऑगस्टपासून अर्ज भरण्यास सरुवात झाली. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबपर्यंत देण्यात आली होती. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार नंतर ती आणखी आठवडाभर म्हणजे २२ सप्टेंबपर्यंत वाढविण्यात आली. शुक्रवारच्या शेवटच्या दिवशी दुपारी १२ वाजेपर्यंत १ कोटी ४ लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली. परंतु प्रत्यक्षात कर्जमाफीसाठी ५७ लाख ६८ हजार अर्ज दाखल करण्यात आले. हा आकडा फार तर ५८ लाखांपर्यंत जाईल. त्यामुळे राज्य सरकारला बँका व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी ८९ लाख कर्जदार शेतकऱ्यांचा आकडा दिला कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याचीही चौकशी केली जाईल, असे सहकार विभागातील सूत्राकडून सांगण्यात आले. ८९ लाख शेतकऱ्यांचे ३४ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याचे जाहीर करण्यात आले होते.

पुढे काय?

अर्ज दाखल करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या घटल्याने ३४ हजार कोटींचा आकडाही कमी होईल, अशी शक्यता आहे. परंतु कर्जमाफी योजनेत कर्ज पुनर्गठनाचाही समावेश करण्यात आल्याने कर्जमाफीच्या रकमेत फारसा फरक पडणार नाही, असे या विभागातील अधिकाऱ्यांचे मत आहे. मात्र अंतिम छाननीतच कर्जदार शेतकऱ्यांची संख्या आणि त्यासाठी कर्जमाफीसाठी किती रक्कम मोजावी लागणार आहे, हे स्पष्ट होणार आहे. दिवाळीपूर्वी प्रत्यक्ष कर्जमाफीची रक्कम बँकांमध्ये जमा करण्यास सुरुवात होईल, अशी माहिती देण्यात आली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Only 58 lakh farmers apply for loan waiver scheme
First published on: 23-09-2017 at 04:29 IST