इंग्लडमधील कॉर्नवॉल येथे झालेल्या जी-७ राष्ट्रांच्या परिषदेत इतर राष्ट्रांबरोबर अतिथी देश असलेल्या भारताने इंटरनेट बंदी विरोधातील प्रस्तावावर स्वाक्षरी केली. भारताने घेतलेल्या या भूमिकेवरून सध्या केंद्रात सत्तेत असलेल्या मोदी सरकारवर राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी निशाणा साधला आहे. “ऊर भरून आला” असा उपरोधिक टोला आव्हाड यांनी लागवला आहे.

११ ते १३ जून दरम्यान इंग्लंडमध्ये जी-७ राष्ट्राची परिषद झाली. जी-७ देशांत ब्रिटन, कॅनडा, फ्रान्स, इटली, जर्मनी, जपान व अमेरिका यांचा समावेश असून भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया, दक्षिण आफ्रिका हे अतिथी देश आहेत. या परिषदेत काही ठराव मांडण्यात आले होते. त्यापैकी एक म्हणजेच जगातील अनेक देशांमध्ये इंटरनेट बंदी करून मानवाधिकारांची गळचेपी होत असल्याच्या मुद्द्यासंदर्भात ठराव प्रस्तावित करण्यात आला होता.

हेही वाचा- भारत ‘जी-७’ राष्ट्रांचा नैसर्गिक सहकारी : मोदी

इंटरनेटबंदी विरोधातील या ठरावावर भारतानेही स्वाक्षरी केली. या ठरावा स्वाक्षरी करण्याच्या सरकारच्या भूमिकेवर जितेंद्र आव्हाड निशाणा साधला. आव्हाड यांनी एक ट्विट करत सरकारच्या भूमिकेबद्दल प्रश्न उपस्थित करत खोचक टोला लगावला. “इंटरनेट बंदीत जगात पहिला क्रमांक मिळवणाऱ्या भारताने काल जी ७ राष्ट्रांच्या शिखर परिषदेत “इंटरनेट बंदी विरोधाच्या” ठरावावर स्वाक्षरी केली. ऊर भरून आला!,” असं म्हणत आव्हाडांनी सरकारला चिमटा काढला आहे.

हेही वाचा- “…म्हणून कारने आत्महत्या केली”; जितेंद्र आव्हाडांनी मोदी सरकारला लगावला टोला

करोना लशी पेटंटमुक्त करण्याचा मोदींनी केला आग्रह

करोना साथीचा जागतिक मुकाबला करण्यासाठी कोविड लशी पेटंटमुक्त कराव्यात, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-७ बैठकीत बोलताना शनिवारी केले. करोना लशींवरचे पेटंट माफ करावे, अशी मागणी भारताने जागतिक व्यापार संघटनेत केली आहे, त्याला जी ७ देशांनी पाठिंबा द्यावा. जागतिक आरोग्य प्रशासन व सुविधा सुधारण्याच्या सामुदायिक प्रयत्नांनी भारत मदत करील. जागतिक व्यापार संघटनेत ट्रिप्स व पेटंट माफ करण्याचे आम्ही जे प्रस्ताव मांडले आहेत ते मंजूर करावेत. ‘एक जग एक आरोग्य’ असाच संदेश आपण आजच्या या जागतिक शिखर बैठकीच्या निमित्ताने देत आहोत,” असं मोदी या परिषदेत बोलताना म्हणाले.