देशात आणि महाराष्ट्रात गेल्या चार वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीला सातत्याने निवडणुकांमध्ये यश मिळाले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करूनही सांगली व जळगाव या महानगरपालिकांमध्ये भाजपाचाच विजय झाला. त्यामुळे विरोधकांना भाजपाच्या विरोधात प्रचाराचा मुद्दाच सापडत नसल्याने ते जनतेची दिशाभूल करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा घणाघाती आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी केला. भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या वेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या वेळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, प्रदेश कोषाध्यक्ष शायना एन. सी., प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, प्रवक्ते केशव उपाध्ये, गणेश हाके व अवधूत वाघ उपस्थित होते. दानवे पुढे म्हणाले की भाजपाने राज्यातील जवळजवळ सर्व बूथमध्ये मजबूत संघटनात्मक बांधणी केली आहे. ‘वन बूथ, ट्वेंटी फाईव्ह यूथ’ ही योजना अंमलात आणली आहे. निवडणूक यादीतील एकेका पानाची जबाबदारी कार्यकर्त्यांना दिली आहे. त्यामुळे भाजपा आगामी निवडणूक संघटनात्मक बळावर जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आगामी निवडणूक शिवसेनेला सोबत घेऊन लढावी, असा आमचा प्रयत्न आहे. शिवसेनाही साथ देईल अशी आशा आहे, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
खा. रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीवरून काँग्रेस पक्ष केंद्र सरकारवर करत असलेल्या आरोपांमध्ये बिलकूल तथ्य नाही. राफेलविषयी झालेला करार भारत व फ्रान्स या दोन देशांच्या सरकार दरम्यान झाला होता. त्यामध्ये कंपनीचा काही संबंध नव्हता. या प्रकरणात कसलीही देवाणघेवाण झाली नसून काँग्रेसच्या आरोपांमध्ये कसलेही तथ्य नाही. या विषयी काँग्रेस पक्ष दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे.