scorecardresearch

शिवसैनिकांच्या आक्रमक भूमिकेनंतर पोलीस यंत्रणा सतर्क; मुंबईत १० जुलैपर्यंत जमावबंदीचे आदेश

यासंदर्भात मुंबई पोलिसांनी परिपत्रक जारी केलं आहे

MUMBAI POLICE
मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय

एकनाथ शिंदे यांच्या बंडात सामील झालेल्या आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. राज्याच्या अनेक भागांत बंडखोर आमदारांच्या कार्यालयांवर शिवसैनिकांनी घोषणाबाजी करीत निषेध मोर्चे काढले आणि त्यांच्या फलकांना काळे फासले आहे. तर काही ठिकाणी कार्यालयांची तोडफोड करण्यात आली आहे. दरम्यान, बंडखोर आमदार राज्यात परतल्यावर संघर्ष वाढण्याचीच ही पूर्वलक्षणे मानली जात आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. शहरात कायदा व व्यवस्था अबाधित राहावी यासाठी आजपासून १० जुलैपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आले आहेत. यासंदर्भात मुंबई पोलिसांनी परिपत्रक जारी केलं आहे. मुंबईतील सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व अपर पोलीस आयुक्त व सर्व पोलीस उप आयुक्त यांची बैठक पार पडली.

मुंबईतील सर्व राजकीय पक्षांचे कार्यालय, मंत्री, खासदार, आमदावर व महत्त्वाचे नगरसेवक यांचे कार्यालय, निवासस्थान शाखा या ठिकाणी बंदोबस्त लावण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे स्थानिक राजकीय व्यक्तींसोबत समन्वय ठेवऊन आगाऊ माहिती काढण्याच्या सूचना दिल्या आहे. सध्या चालू असलेले राजकीय कार्यक्रम, बैठका याठिकाणी योग्य बंदोबस्त ठेवण्याबाबत सांगण्यात आले आहे. विशेष शाखेने सोशल मिडीयावर लक्ष ठेवून संबधितांना आवश्यक माहिती त्वरीत देण्यास सांगितले आहे. स्थानिक ठिकाणी संभाव्य राजकीय हालचालीबाबत माहिती घेवून योग्य कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलिसांच्या परित्रकात म्हटले आहे.

लोकसत्ता विश्लेषण: संचारबंदी, जमावबंदी, कलम १४४ म्हणजे काय? नियम मोडल्यास, दोषी ठरल्यास शिक्षा काय?

“कोणताही राजकीय पक्ष कायदा हातात घेणार नाही, हिंसा करणार नाही आणि तोडफोड करणार नाही याबाबत आवश्यक सूचना दिल्या. कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह पोस्टर, बॅनर लागणार नाही याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे. आवश्यक प्रतिबंधक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्याबी प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही या दृष्टीने सर्वांनी सजग राहून कर्तव्य करणे अपेक्षित आहे,” अशाही सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Order for a curfew in mumbai till july 10 on the political situation in maharashtra abn