मुंबई : ‘युवा पिढीकडे व नवोदितांकडे खूप निरनिराळ्या संकल्पना असतात आणि त्यांच्या छोट्या, पण प्रभावी संकल्पना एखाद्या कलाकृतीत उतरविण्याची संधी ओटीटी माध्यमावर मिळते. छोटी गोष्ट मर्यादित असल्यामुळे दोन ते तीन तासांच्या चित्रपट माध्यमासाठी वापरू शकत नाही. त्यामुळे नवोदितांमधील संकल्पनांना वाट मोकळी करून देण्यासाठी ओटीटी माध्यम उपयुक्त ठरते’, असे मत प्रसिद्ध अभिनेता प्रतीक गांधी याने सेंट झेविअर्स महाविद्यालयाच्या ‘मल्हार’ महोत्सवात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना व्यक्त केले.
मुंबईतील महत्वाच्या आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक स्पर्धा महोत्सवांपैकी एक असणाऱ्या फोर्ट येथील सेंट झेविअर्स महाविद्यालयाच्या ‘मल्हार’ महोत्सवाचे १५ व १६ ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले आहे. यंदा ‘मल्हार’ महोत्सवाचे ४६ वे वर्ष असून ‘द वर्ल्ड विदिन’ या मध्यवर्ती संकल्पनेवर विविध स्पर्धा आधारित आहेत. साहित्य कला, ललित कला, सादरीकरण कला आणि क्रीडा विभागातील विविध स्पर्धांची मेजवानी स्पर्धकांना अनुभवायला मिळत आहे.
या महोत्सवाअंतर्गत शुक्रवार, १५ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवरील ‘सारे जहाँ से अच्छा : द सायलेंट गार्डियन’ या वेबमालिकेच्या कलाकारांसोबत विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात अभिनेता प्रतीक गांधी, सनी हिंदुजा, अनुप सोनी, सुहेल नय्यर, अभिनेत्री कृतिका कामरा हे कलाकार सहभागी झाले होते. यावेळी प्रतीक गांधीसह कलाकारांनी आजवरच्या प्रवासातील विविध किस्से सांगत ओटीटी माध्यमावरही भाष्य केले.

‘एखादी ३० मिनिटांची गोष्ट चित्रपट कलाकृतीत मांडता येत नाही. तसेच ९ ते १० तासांत मांडता येणारी गोष्टही चित्रपटासाठी वापरणे अशक्य आहे. ही गोष्ट ओटीटी माध्यमावर सहा ते सात भागांच्या वेबमालिकेच्या स्वरूपात मांडता येईल आणि त्यामुळे संबंधित विषय योग्य पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. तसेच चित्रपट असो किंवा ओटीटी दोन्ही माध्यमांची रचना व वैशिष्ट्ये वेगळी आहेत.

ही दोन्ही माध्यमे आपापल्या स्तरावर उत्तम आहेत. त्यामुळे कोणत्या माध्यमाला पसंती द्यायची हे प्रेक्षकांवर अवलंबून असते’, असेही प्रतीक गांधी म्हणाला.