मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी कक्ष) विधि तीन वर्षे व पाच वर्षे अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या दोन्ही अभ्यासक्रमाच्या नियमित फेऱ्या पार पडल्या असून त्यात दोन्ही अभ्यासक्रमांसाठी २१ हजार ३० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. दोन्ही अभ्यासक्रमाच्या संस्थात्मक फेरीसाठीची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे.

विधि तीन वर्ष अभ्यासक्रमासाठी असलेल्या २३ हजार ५३० जागा आणि विधि पाच वर्ष अभ्यासक्रमाच्या १३ हजार ५८९ जागांसाठी सीईटी कक्षाकडून प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या प्रवेश प्रक्रियेंतर्गत नियमित फेऱ्यांद्वारे विधि तीन वर्ष अभ्यासक्रमासाठी १३ हजार ३०५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले तर विधि पाच वर्ष अभ्यासक्रमासाठी ७ हजार ७२५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. त्यामुळे या दोन्ही अभ्यासक्रमाच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत.

विधि तीन वर्ष अभ्यासक्रमाच्या ९ हजार १५८ तर विधि पाच वर्ष अभ्यासक्रमाच्या ५ हजार ८६४ जागा रिक्त आहेत. या सर्व जागा आता संस्थात्मक स्तरावर भरण्यात येणार आहे. विधि पाच वर्ष अभ्यासक्रमाच्या संस्थांत्मक फेरीसाठी नोंदणी प्रक्रिया सीईटी कक्षाकडून राबविण्यात आली आहे. या फेरीसाठी विद्यार्थ्यांना नाव नोंदणी करणे, अर्जात दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे सीईटी कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.