मुंबई : राज्यातील अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या नऊ फेऱ्यानंतर तब्बल १३ लाख ३३ हजार ८९३ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले. मात्र त्यानंतरही राज्यातील जवळपास ८ लाख ३५ हजार ७६४ इतक्या जागा रिक्त राहिल्या आहेत.
यंदा प्रथमच संपूर्ण राज्यभर अकरावीचे प्रवेश पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आले. प्रवेशासाठी तब्बल १४ लाख ८५ हजार ६८६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परंतु उपलब्ध जागांची संख्या यापेक्षा तब्बल ७ लाखांनी जास्त म्हणजे २१ लाख ६९ हजार ६५७ इतकी होती. शनिवारी प्रवेश प्रक्रियेची शेवटची फेरी संपल्यानंतर १३ लाख ३३ हजार ८९३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून १८ लाख २३ हजार ९६० जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी ११ लाख ६५ हजार १११ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला, तर ६ लाख ५८ हजार ८४९ जागा रिकाम्या राहिल्या. याशिवाय, अल्पसंख्याक, व्यवस्थापन या कोट्यांतर्गत ३ लाख ४५ हजार ६९७ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी १ लाख ६८ हजार ७८२ जागा भरल्या गेल्या असून उर्वरित १ लाख ७६ हजार ९१५ जागा रिकाम्या राहिल्या आहेत.
दरवर्षी प्रवेशानंतर लाखो जागा रिकाम्या राहतात. तरीदेखील दरवर्षी नव्या महाविद्यालयांना व तुकड्यांना परवानगी दिली जाते. त्यामुळे ‘विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित असताना जागा का वाढवल्या जातात?’ असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित करण्यात येत आहे.
अशी आहे आकडेवारी….
एकूण जागा : २१,६९,६५७
झालेले प्रवेश : १३,३३,८९३
रिक्त जागा : ८,३५,७६४