मुंबई : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून यात महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करीत, वाढदिवसानिमित्त २५ एप्रिल रोजी आयोजित केलेले सर्व कार्यक्रम रद्द करण्याचे आवाहन परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी कार्यकर्त्यांना केले. केवळ रक्तदान आणि आरोग्य शिबिरांचे आयोजन करावे, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.
सरनाईक म्हणाले की, पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना अतिशय कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी. पर्यटकांना ज्या पद्धतीने ठार मारण्यात आले ती संतापजनक बाब असून माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो.शिवसेना पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या आवाहनानुसार श्रीनगर येथे अडकून पडलेल्या सर्व पर्यटकांना सुखरूप घरी आणण्याचे प्रयत्न कार्यकर्ते करीत आहेत. तसेच हल्ल्यांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये सहभागी असून या कुटुंबावर कोसळलेल्या संकटाला सामोरे जाण्याचे धैर्य त्यांना द्यावे, अशी सर्वांनीच ईश्वरचरणी प्रार्थना करावी, असे आवाहन त्यांनी केले.
जम्मू काश्मीर मधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सरनाईक यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती युवा सेनेचे कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी दिली.
…आदल्या दिवशी सरनाईक विमानतळावर
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीर परिसरात महाराष्ट्रातील विविध भागातील पर्यटक अडकले होते. राज्य सरकारने त्यांना विशेष विमानाने सुखरूपपणे मुंबईत आणले. त्यानंतर मुंबईवरून पुढील प्रवासासाठी, राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने वातानुकूलित शिवनेरी बस उपलब्ध केली. तसेच पर्यटकांना धीर देण्यासह संपूर्ण वाहतूक व्यवस्थेच्या देखरेखीसाठी सरनाईक विमानतळावर उपस्थित होते.