मुंबई : गलवानच्या घटनेनंतर चीनसोबत झालेल्या सीमावादाच्या चर्चावर भारतीय नौदलाच्या व्यूहात्मक प्रभावाचा परिणाम होता, असे ठाम प्रतिपादन करतानाच पाकिस्तान-चीन यांच्या नौदलांतील वाढते सहकार्य हा मात्र चिंतेचा विषय आहे, असे भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख ध्वजाधिकारी व्हाइस अ‍ॅडमिरल अजेंद्र बहादूर सिंग यांनी स्पष्ट केले.१९७१ च्या युद्धात कराची बंदरात घुसून भारतीय नौदलाने पाकिस्तानी युद्धनौकांना जलसमाधी दिली आणि त्यांचे तेलसाठे उद्ध्वस्त केले. परिणामी पाकिस्तानी नौदलाचे कंबरडे मोडले. त्या शौर्याचे स्मरण म्हणून ४ डिसेंबर हा दिवस प्रतिवर्षी नौदल दिन म्हणून तर आठवडा नौदल सप्ताह म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने ‘आयएनएस कोलकाता’ या स्टेल्थ मार्गदर्शक क्षेपणास्त्र विनाशिकेवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अ‍ॅडमिरल सिंग म्हणाले की, सागरावर कार्यरत असले तरी नौदलाच्या व्यूहात्मक प्रभावाचा परिणाम जमिनीवरील सीमारेखांच्या वाद-चर्चावरही असतो, म्हणून नौदल महत्त्वाचे ठरते. मात्र नौदलाच्या कार्याचा असाही वेगळा महत्त्वाचा परिणाम असू शकतो, याचा लोकांना विसरच पडतो. आपल्या दुखऱ्या बाजूला कुणी लक्ष्य करत असेल तर त्याला त्रासच होईल हे आपण कटाक्षाने पाहायलाच हवे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

सागरावर भारतीय नौदलाचा हुकूमत आहे. हे लक्षात घेऊन भारतीय नौदलाने त्या काळात ज्या काही कारवाया हाती घेतल्या व व्यूहात्मक रचना केली त्याचा गलवानोत्तर सीमावाद चर्चावर परिणाम पाहायला मिळतो. त्या काळात नेमके काय घडले, असे विचारता मात्र ती माहिती गोपनीय स्वरूपाची आहे, असे त्यांनी सांगितले. 

पाकिस्तानी नौदलाच्या धोरणात बदल

दरम्यानच्या काळात पाकिस्तानी नौदलाच्या धोरणांतही महत्त्वपूर्ण बदल पाहायला मिळत आहे. पूर्वी त्यांच्याकडे असलेल्या युद्धनौका आणि पाणबुडय़ा या इतरत्र कुणी तरी वापरलेल्या होत्या, त्यामुळे त्यांच्या क्षमतांनाही मर्यादा होत्या. आता मात्र नव्याकोऱ्या युद्धनौका व पाणबुडय़ांचे आणि नव्या यंत्रणांचे व त्यांच्या क्षमतांचे महत्त्व पुरते लक्षात आले असून त्यामुळेच हा नवा बदल दिसतो आहे. चीनसोबतच्या त्यांच्या सहकार्यात वाढ झाली असून तो चिंतेचा विषय नक्कीच आहे.

चिनी नौदलावर करडी नजर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चीनने सध्या मोठय़ा नौदलासाठी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे, याची भारतीय नौदलास पूर्ण कल्पना आहे. त्यांच्या युद्धनौकाही मोठय़ा आकाराच्या असून त्यांची बांधणी वेगात सुरू आहे. येणाऱ्या काळात त्यांचा हिंदूी महासागरातील वावरावर परिणाम पाहायला मिळेल. चीनच्या युद्धनौका, संशोधननौका, सागरीपरिक्षण करणाऱ्.या नौका, मासेमारीच्या निमित्ताने आक्रमक घुसखोरी करणाऱ्या नौका आणि आक्रमक चिनी नौदर्ल हिंदूी महासागरात दिसते आहे. ते नेमके कुठे आहेत याची भारतीय नौदलाला कल्पना आहे आणि आपण नेमके कुठे आहोत हेही आपण त्यांना नक्कीच दाखवून देणार आहोत! ही एक प्रक्रियाच असते. चिनी नौदलावर आपली करडी नजर आहे, त्या नजरेतून काहीही सुटणार नाही, हे लक्षात घेऊनच आपल्याला भविष्यातील नौदल धोरणाची आखणी करावी लागेल, असेही व्हाइस अ‍ॅडमिरल सिंग म्हणाले.