मुंबई : अमली पदार्थाच्या वाढलेल्या सागरी तस्करीमागे अफगाणिस्तानात आलेली तालिबानी राजवट हे कारण असले तरी त्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे नि:संशयपणे लक्षात आले आहे, असे प्रतिपादन भारतीय नौदलाच्या पश्चिम त़ळाचे प्रमुख ध्वजाधिकारी व्हाइस अ‍ॅडमिरल अजेंद्र बहादूर सिंग यांनी येथे केले. ते म्हणाले की, यातून येणाऱ्या पैशांचा वापर दहशतवादी कारवायांसाठी केला जातो. म्हणूनच त्याला आळा घालण्यासाठी भारतीय नौदलाने कंबर कसली आहे.

नौदल दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते म्हणाले की, मकरान किनारपट्टीच्या मार्गाने होणाऱ्या अमली पदार्थाच्या तस्करीत मोठी वाढ झाली आहे. अलीकडे नौदलानेही कारवाई करून काही मोठे साठे जप्त केल्याच्या घटनाही वाढल्या आहेत. अमली पदार्थाच्या तस्करीचा दहशतवादाशी थेट संबंध असल्याने नौदलाने टेहळणी वाढवली आहे. त्यासाठी पी-१८ टेहळणी विमानांचा वापर केला जातो. या टेहळणीशिवाय सागरावरील संवादलहरी पकडून त्या मार्फतही तस्करांचा माग काढला जातो. या संदर्भात देशातील व बाहेरील गुप्तचर यंत्रणांकडून येणारे संदेश व माहिती मोलाची कामगिरी बजावते.

किमान २०० युद्धनौकांची गरज..

भारतीय नौदलाच्या ताफ्यात किमान २०० युद्धनौका असणे गरजेचे आहे, असे एका प्रश्नाच्या उत्तरात सांगून व्हाइस अ‍ॅडमिरल सिंग म्हणाले की आता नव्या ३९ युद्धनौकांची बांधणी सुरू असून त्यातील ३७ युद्धनौकांची निर्मिती केवळ भारतात होत आहे. तर दोन युद्धनौकांचे काम भारतात सोय नसल्याने आणि आपल्याला लवकर हव्या असल्यानेच विदेशात सुरू आहे. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने सुरू असलेला प्रवास समाधानकारक आहे, असेही ते म्हणाले.