मुंबई : अंधेरी परिसरात काही दिवसांपूर्वी एका घरातून दुर्मीळ पॅलिड स्कॉप्स घुबडाची सुटका करण्यात आली. जखमी अवस्थेतील या घुबडाला वन्यजीवप्रेमींनी सुरक्षित ताब्यात घेतले असून सध्या त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. दरम्यान, मुंबईत घुबडाची ही प्रजाती दिसणे अत्यंत दुर्मीळ आहे. यापूर्वी २०१६ आणि २०२१ मध्ये भांडूप उदंचन केंद्रावर याची नोंद झाली आहे.
अंधेरी पूर्व येथील गृहसंकुलातील एका घरात काही दिवसांपूर्वी रात्री साधारण १०.३० च्या सुमारास पॅलिड स्कॉप्स घुबड आले असल्याची माहिती वन्यजीवप्रेमी तसेच कार्यकर्ते करण सोलंकी यांना मिळाली. माहिती मिळताच करण सोलंकी तसेच द होप फॉर अॅनिमल्स वेल्फेअर ट्रस्टचे संस्थापक नवीन सोलंकी हे त्यांच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले.
घुबड चुकून घराच्या खिडकीतून आत शिरले होते. घुबडावर वैद्यकीय उपचार करताना घुबडाच्या डाव्या पंखाला जखम झाली असल्याचे निदर्शनास आले. ही बाब लक्षात येताच वन विभागाला या बाबत कळविण्यात आले असून घुबडावर पुढील वैद्यकीय उपचार सुरु करण्यात आले आहेत.
दरम्यान, घुबडाची ही प्रजाती प्रामुख्याने पाकिस्तान आणि सौदी अरेबिया, कुवेत, ओमान, इराक आदी भागात आढळते. त्याचबरोबर क्वचित हिवाळ्यात गुजरातच्या काही भागात दिसते. या प्रजातीची मुंबईत २०१६ आणि २०२१ मध्ये भांडूप उदंचन केंद्रावर नोंद करण्यात आली आहे.
पॅलिड स्कॉप्स घुबडाचा रंग वाळूसारखा फिकट असतो. आकार साधारण १७ ते २० सेंमी इतका असतो. त्याचबरोबर शरीरावर सूक्ष्म गडद रेषा आणि ठिपके असतात. ही प्रजाती मुख्यतः कोरड्या प्रदेशात, विरळ जंगलात आढळते. ही प्रजात आहार म्हणून कोळी, पतंग कधी कधी लहान सरडे किंवा लहान सस्तन प्राणीही खाते. या घुबडांचे जीवनमान साधारण १० ते १५ वर्षे असते. ही प्रजात शांत, सावध असून दिवसा खूपच निश्चल राहतात, त्यामुळे निदर्शनास कमी येतात.
आकर्षक का मानले जाते
इतर घुबडांपेक्षा या प्रजातीचा रंग फिकट, सौम्य असतो. आकाराने लहान आणि न दिसणारे म्हणून पक्षीनिरिक्षकांसाठी त्याचे दर्शन हे अपूर्वाईचे आहे.
