मुंबई : हिंदूस्तानी शास्त्रीय संगीतातील अलौकिक स्वरतपस्वी पंडित कुमार गंधर्व यांची कन्या प्रसिध्द शास्त्रीय गायिका कलापिनी कोमकली यांच्याशी आज, रविवारी गप्पांची मैफल रंगणार आहे. आपल्याकडे असलेला सुरांचा अलौकिक ठेवा जपतानाच शास्त्रीय संगीतात स्वत:ची गायनशैली घडवणे हे खचितच सोपे न भासणारे यश त्यांनी साध्य केले. हा गानप्रवास ‘लोकसत्ता गप्पां’मधून कधी आठवणींच्या रुपात तर कधी स्वरांतून उलगडला जाणार आहे. पंडित कुमार गंधर्व आणि वसुंधरा कोमकली या अत्यंत विलक्षण, प्रतिभावंत शास्त्रीय संगीत गायक दाम्पत्याची कन्या म्हणून कलापिनी यांच्याकडे मोठया अपेक्षेने पाहिले जाते. मात्र कोणत्याही अपेक्षांचे दडपण न घेता वा आपल्या पूर्वसुरींच्या छायेत अडकून न राहता कलापिनी यांनी शास्त्रीय संगीतात स्वत:ची ओळख निर्माण केली.

कुमार गंधर्वाकडून गायनाचे धडे त्यांनी घेतले तसेच आईकडूनही गायकीचे तंत्र त्यांनी शिकून घेतले.  शास्त्रीय संगीताच्या अभ्यासात आणि स्वरसाधनेत रमलेल्या कलापिनी आज प्रतिभावंतांच्या पिढीची समर्थ प्रतिनिधी आणि प्रसिध्द शास्त्रीय गायिका म्हणून ओळखल्या जातात. ‘कुमार गंधर्व प्रतिष्ठान’च्या माध्यमातून शास्त्रीय संगीताच्या प्रचार-प्रसारासाठीही त्या कार्यरत आहेत. आई – वडिलांबरोबर त्यांनी अनुभवलेले शास्त्रीय संगीताचे विश्व, त्यांनी जवळून पाहिलेली त्यांची स्वरसाधना, दिग्गज व्यक्तिमत्वांचा लाभलेला सहवास, काळाबरोबर बदलत गेलेले हिंदूस्तानी शास्त्रीय संगीत असे कितीतरी अनुभव खुद्द त्यांच्याकडून ऐकायला मिळणार आहेत. प्रसिध्द अभिनेत्री शुभांगी गोखले त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘लोकसत्ता गप्पा’ या उपक्रमांतर्गत याआधी ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा, ज्येष्ठ गायक सत्यशील देशपांडे, प्रतिभावंत कवी-गीतकार गुलजार, जावेद अख्तर, प्रतिभावान शास्त्रीय गायक पंडित मुकुल शिवपुत्र, उस्ताद रशीद खान, अभिनेते नसीरुद्दीन शाह, रत्ना पाठक शाह ही मंडळी सहभागी झाली होती. गप्पांचा हा कार्यक्रम निमंत्रितांसाठी आहे.