‘महाराष्ट्र सदन’ बांधकाम घोटाळाप्रकरणी चौकशी करीत असलेल्या सक्तवसुली संचालनालयाने भुजबळपुत्र पंकज यांना चौकशीसाठी आज पाचारण केले आहे. त्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्यास समीर यांच्याप्रमाणेच त्यांनाही अटक होऊ शकते, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सूचित करण्यात आले. दुसरीकडे अमेरिका दौऱ्यावर असलेले छगन भुजबळ हे आज मुंबईत परतत असून, विमानतळावर त्यांच्या समर्थकांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.
समीर भुजबळ यांना गेल्या आठवडय़ात अटक झाली. तेव्हाच पंकजच्या अटकेची चर्चा सुरू झाली होती. पंकजचे पारपत्र (पासपोर्ट) सक्तवसुली संचालनालयाने जप्त केले आहे. पंकज यांना आज चौकशीसाठी पाचारण करण्यात आले आहे. तसे पत्र त्यांना शनिवारी देण्यात आले. पंकज हे मंगळवारी हजर होतात की वेळ मागून घेतात हे स्पष्ट झाले नव्हते. कदचित ते त्याचवेळी वेळ मागून घेण्याची शक्यता आहे. समीर आणि पंकजला समोरासमोर आणून त्यांची चौकशी केली जाणार आहे. महाराष्ट्र सदनाच्या इमारतीचे बांधकाम करण्याचे काम देण्याच्या बदल्यात भुजबळांना ठेकेदाराकडून लाच मिळाल्याचा आरोप आहे. ही रक्कम कोठे वळविण्यात आली याचा तपास सध्या संचालनालयाकडून केला जात आहे.
समीरला अटक झाली त्याच्या आदल्याच दिवशी छगन भुजबळ हे अमेरिकन काँग्रेसमध्ये भाषण करण्याकरिता वॉशिंग्टन डीसीला रवाना झाले होते. भुजबळ उद्या मुंबईत परतत असून, समर्थकांकडून त्यांचे जंगी स्वागत मुंबई विमानतळावर केले जाणार आहे.
भुजबळांच्या स्वागताकरिता समता परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. तसे आवाहन कार्यकर्त्यांना करण्यात आले आहे. विमानतळापासून भुजबळ आणि त्यांच्या समर्थकांचा गाडय़ांचा ताफा राष्ट्रवादीच्या मुख्यालयात येणार आहे. भुजबळ पत्रकार परिषदेत भूमिका मांडणार आहेत.

समीर भुजबळांची २२ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी
मुंबई : महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या छगन भुजबळ यांचे पुतणे आणि माजी खासदार समीर भुजबळ यांनी गैरव्यवहारातून जमवलेला पैसा गुंतवण्यासाठी विविध कंपन्या स्थापन केल्याची माहिती चौकशीदरम्यान पुढे आल्याची माहिती अंमलबजावणी संचालनालयातर्फे (ईडी) सोमवारी विशेष न्यायालयात देण्यात आली. विशेष म्हणजे एकीकडे समीर हे चौकशीत सहकार्य करत नसल्याचा दावा करणाऱ्या ‘ईडी’ने दुसरीकडे मात्र त्यांच्या कोठडीत वाढ करण्याच्या मागणीऐवजी त्यांना न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली. ती मान्य करत न्यायालयाने समीर यांना २२ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे समीर हे जामिनासाठी अर्ज करण्याची शक्यता आहे.
नऊ तासांच्या चौकशीत विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर देण्यात समीर हे अपयशी ठरल्याने ‘ईडी’ने त्यांना अटक केली होती. त्यांच्या कोठडीची मुदत संपल्याने सोमवारी समीर यांना न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी समीर यांच्या चौकशीत काय निष्पन्न झाले याची माहिती ‘ईडी’च्या वतीने अ‍ॅड. हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयाला दिली. गैरव्यवहारातून जमा केलेला पैसा नियमित दाखवण्यासाठी विविध कंपन्या स्थापन करून त्यात गुंतविण्यात आल्याचे त्यांच्या चौकशीतून पुढे आले आहे. तसेच घोटाळ्यातील ८७० कोटी रुपये कुठे कुठे गुंतवण्यात आले आहेत याचीही चौकशी सुरू असल्याचा दावा ‘ईडी’तर्फे करण्यात आला.

सर्व भुजबळांची चौकशी करा – किरीट सोमय्या</strong>
छगन भुजबळ यांच्यासह समीर आणि पंकज यांची एकत्रित चौकशी करून बेनामी रक्कम गेली कोठे याचा सक्तवसुली संचालयाने तपास करावा, अशी मागणी भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे.
समीर भुजबळ सत्र न्यायालयात सोमवारी उपस्थित होते.