पार्किंगला जागा नाही.. रस्त्यावर पार्क केली तर कोणी ती चोरणार तर नाही ना? नातेवाईकांकडे ठेवावी का? शहरातील वाहनधारकांना भेडसावणारे हे प्रश्न आता मिटण्याची शक्यता आहे. तुमची गाडी इमारतीलगतच्या रस्त्यावरच पार्क करता येईल अशी योजना आता मुंबई महापालिकेने योजली आहे. ‘रहिवासी वाहनतळ योजना’ असे या योजनेचे नाव असेल. या योजनेमुळे प्रचलित वाहनतळाच्या दराच्या तुलनेत एकतृतीयांश सूट मिळणार आहे.
पालिकेच्या या योजनेनुसार इमारतीमधील रहिवाशांना लगतच्या रस्त्यावर एका दिशेला वाहने उभी करता येतील. यासाठी रहिवाशांना पालिकेच्या प्रभाग कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल. रस्त्यावरील इमारतींची संख्या, प्रकार, रस्त्यावरील एकेरी-दुहेरी वाहतूक, रुंदी इत्यादी गोष्टींचा विचार करून योजनेवर शिक्कामोर्तब होईल. या वाहनतळावर एका व्यक्तीला एकच वाहन उभे करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. दुसरेच वाहन संबंधित ठिकाणी उभे केल्यास ५० रुपये दंडाची आकारणी करण्यात येणार असल्याचे समजते. ही योजना रात्री आठ ते सकाळी आठ या कालावधीपुरती मर्यादित असेल.त्यामुळे दिवसा गाडी कुठे उभी करावी, हा प्रश्न रहिवाशांना भेडसावणार आहेच.
शुल्कवाढीत बदल नाही
मुंबईकरांवर वाहनतळ शुल्कवाढीची कुऱ्हाड कोसळू नये यासाठी सादर केलेला प्रशासनाचा प्रस्ताव सुधार समितीने धुडकावला होता. मात्र प्रशासनाकडून सादर करण्यात येणाऱ्या सुधारित प्रस्तावात शुल्कवाढीत कोणताही बदल करण्यात आला नाही. त्यामुळे आता राजकारणी मंडळी या प्रस्तावाला पाठिंबा देतात की पुन्हा एकदा तो फेटाळतात हे सुधार समितीच्या पुढच्या बैठकीत स्पष्ट होईल.