लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : पश्चिम उपनगरातील स्वामी विवेकानंद मार्गाच्या (एस. व्ही. रोड) रुंदीकरणाआड येणाऱ्या एक इमारतीचा काही भाग तोडण्याचा अनोखा प्रयोग करण्यात आला आहे. शेवन्ती व्हिला नावाच्या या व्यावसायिक इमारतीचा काही भाग रस्त्याच्या रुंदीकरणात अडसर बनला होता. त्यामुळे तेवढात तीन मीटर रुंदीचा भाग तोडून उर्वरित इमारत जतन करण्यात आली आहे. हे काम पूर्ण झाले असून इमारतीतील तीन गाळ्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे.
वांद्रे येथून थेट बोरिवलीपर्यंत जाणारा एस. व्ही. रोड हा मुंबईतील एक अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. मात्र हा मार्ग अरुंद असल्यामुळे वाहतूक कोंडी होत असते. एस.व्ही. रोडची जास्तीत जास्त रुंदी ही ९० फूट आहे. मात्र गोरेगाव – कांदिवली परिसरात या रस्त्यावर अनेक ठिकाणी बांधकामे असल्यामुळे वाहतूक कोंडी होते. त्यामुळे या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम पालिका प्रशासनाने गेल्या अनेक वर्षांपासून हाती घेतले आहे. टप्प्याटप्प्याने ही बांधकामे हटवण्यात येत आहेत. गोरेगाव – कांदिवली दरम्यानच्या परिसरात तब्बल ३२४ बांधकामे या रस्त्याच्या रुंदीकरणाआड येत होती. त्यापैकी आतापर्यंत सुमारे पावणेतीनशे बांधकामे हटवण्यात आली आहेत. आतापर्यंत चार ठिकाणी वाहतूक कोंडी होणारे अरुंद भाग मोकळे करण्यात आले आहेत. मालाड येथील शेवंती व्हिला या इमारतीमुळे पेच निर्माण झाला होता. या इमारतीचा काही भागच केवळ बाधित होत होता. शेवंती व्हिला इमारतीच्या मालकाला इमारतीची संरचनात्मक तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे या इमारतीची संरचनात्मक तपासणी करून इमारतीचा काही भाग तोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार संरचनात्मक सल्लागार नेमून या इमारतीचा काही भाग तोडण्याचे काम पूर्ण करण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
आणखी वाचा-बुलढाणा जिल्ह्यातील विषबाधा झालेल्या रुग्णांवर रुग्णालयाबाहेर उपचार प्रकरणाची उच्च न्यायालयाकडून दखल
शेवंती व्हिला दुमजली व्यावसायिक इमारत असून तिची रुंदी ४० मीटर आहे. त्यापैकी तीन मीटर भाग रस्ता रुंदीकरणाच्या आड येत होता. त्यामुळे ही इमारत रिकामी करून रस्त्याच्या रुंदीकरणाआड येणारा भाग पाडण्यात आला. उर्वरित इमारत जतन करण्याचे काम करण्यात येणार आहे. या कामामुळे तीन गाळे बाधित झाले आहेत. या कामासाठी पी उत्तर विभागाने पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची परवानगी घेतली असून बाधित गाळ्यांना नियमानुसार नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. या तीनही व्यावसायिक गाळेधारकांकडे १९६३ पासून पुरावे उपलब्ध होते. त्याची तपासणी करून प्रशासनाने नुकसान भरपाईचा प्रस्ताव तयार केला आहे. या तीन अनिवासी बांधकामांना ७० लाख रुपये मोबदला देण्यात आला आहे. याच परिसरातील आणखी एका निवासी बांधकामाला ३२ लाख ७२ हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.