लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: केईएम रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांवर जलदगतीने वैद्यकीय उपचार करता यावे यासाठी एमआरआय, सीटीस्कॅन, सोनोग्राफी यंत्रे खरेदी करण्याचा निर्णय रुग्णालयीन प्रशासनाने घेतला आहे. मात्र या यंत्र खरेदीचे प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खात्याकडे दीर्घकाळ प्रलंबित आहेत. परिणामी, यंत्रांअभावी रुग्णांवर जलदगतीने उपचार करणे अवघड बनले असून त्याचा थेट फटका रुग्णांना बसत आहे.
केईएम रुग्णालयामध्ये येणाऱ्या रुग्णांना सीटीस्कॅन, एमआरआय, सोनोग्राफी या तपासण्यांसाठी दोन महिने किंवा त्यापुढील तारखा देण्यात येत आहेत. काही विभागात शस्त्रक्रियांसाठी दोन महिन्यांपुढील तारखा दिला जात आहेत. तसेच बाह्यरुग्ण विभागामध्ये रुग्णांना मोफत मिळणारी काही औषधेही बंद झाली आहेत. त्यामुळे तपासण्या व शस्त्रक्रियेचा कालावधी कमी करण्यासाठी आणि रुग्णांना औषधे मोफत मिळावी, तसेच रुग्णालयामध्ये डॉक्टर, कक्षसेवक, परिचारीका, प्रशासकीय कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी, तंत्रज्ञ यांची रिक्त पदे तातडीने भरावी या मागण्यांसाठी शिवडी विधानसभा शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांची भेट घेतली.
हेही वाचा… VIDEO: “कायदे आम्हालाही कळतात, त्यामुळे जे लोक…”, छगन भुजबळ कडाडले, म्हणाले, “शरद पवारांनंतर…”
या भेटीत एमआरआय, सीटीस्कॅन, सोनोग्राफी यंत्रांमध्ये वाढ करणे, रिक्त पदे भरण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. दरम्यान, एमआरआय, सीटीस्कॅन, सोनोग्राफी यंत्रांच्या खरेदीचे प्रस्ताव मध्यवर्ती खरेदी खात्याकडे प्रलंबित असल्याची बाब चर्चेत उघडकीस आली. नवीन यंत्रे उपलब्ध होत नाहीत, तोपर्यंत केईएममधील परिस्थिती सामान्य होणार नाही, असे केईएम रुग्णालयातील प्रशासनाने यावेळी स्पष्ट केले.
या बैठकीत शिवसेनेच्या वतीने माजी महापौर किशोरी पेडणेकर, श्रद्धा जाधव तसेच माजी नगरसेवक सचिन पडवळ, अनिल कोकीळ, दत्ता पोंगडे, सिंधू मसुरकर, उर्मिला पांचाळ आदी उपस्थित होते. तसेच प्रशासनाच्या वतीने केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, डॉ. हरीश पाठक, तसेच केईएम रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहन देसाई, डॉ. प्रवीण बांगर आणि अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
अधिवेशनात मुद्दा उपस्थित करणार
केईएम रुग्णालयातील समस्यांसदर्भात येत्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठवण्यात येईल, असे शिवसेनेचे विधीमंडळ गटनेते अजय चौधरी यांनी सांगितले. यासंदर्भात लवकरच मध्यवर्ती खरेदी खात्यामध्ये बैठक आयोजित करून प्रलंबित प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.