मुंबई : आयुष्यात कितीही संकटे येऊ देत ‘घेतला वसा टाकू नये’ या जिद्दीने देशभरातील तरुणाई अगदी करोना काळात शांतपणे आपापल्या क्षेत्रात कार्यमग्न होती. नवे काही घडवत, कर्तृत्वाचे नवे मापदंड निर्माण करून विविध क्षेत्रांत नव्या प्रकाशवाटा निर्माण करणाऱ्या ध्येयवेडय़ा तरुणांचा गौरव ‘लोकसत्ता तरुण तेजांकित पुरस्कार’ सोहळयात करण्यात आला. अत्यंत मोकळेपणाने आणि दिमाखदार आयोजनात रविवारी हा पुरस्कार सोहळा साजरा झाला.

करोना विषाणू साथीच्या सावटातून बाहेर पडत नव्याने सर्व जीवनमान स्थिरावू पाहते आहे. गेल्या वर्षी करोना निर्बंधांच्या अनुषंगाने नेटक्या पद्धतीने ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कारांचे तिसरे पर्व संपन्न झाले होते. यंदा मोठय़ा उत्साहात हा पुरस्कार सोहळा ‘आयटीसी ग्रँड सेंट्रल’ येथे साजरा झाला. अंगभूत गुण आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर कर्तृत्वाची नवी क्षितिजे उभारणाऱ्या तरुणांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणाऱ्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कारांचे हे चौथे वर्ष होते. देशभरातील ४०० तरुण प्रज्ञावंतांमधून निवडलेल्या १६ लखलखत्या तेजांकितांचा गौरव केंद्रीय मंत्री धर्मेद्र प्रधान यांच्या हस्ते करण्यात आला.

गेली चार पर्व ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमाने आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. ‘चाळिशीच्या आतील विविध क्षेत्रात अफाट काम करणारे अनेक तरुण देशभरात मोठय़ा प्रमाणात आहेत. त्यांच्या कर्तृत्वसिद्धीला तरुण वयातच शाबासकीची थाप मिळायला हवी, मात्र आपल्याकडे अनेकदा नामांकित आणि प्रसिद्ध व्यक्तींचाच ठरावीक पद्धतीच्या समारंभांमधून उदोउदो केला जातो. ‘लोकसत्ता तरुण तेजांकित पुरस्कार’ हा उपक्रम या पुरस्कारांपेक्षा सर्वार्थाने वेगळा आहे. भविष्य घडवणाऱ्या तरुणाईचा वर्तमानात सन्मान करणारा अत्यंत मूल्याधिष्ठित असा हा उपक्रम आहे’, अशा शब्दांत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी या उपक्रमामागचा उद्देश प्रास्ताविकात स्पष्ट केला. प्रतिभावंत आणि नामवंतांच्या मांदियाळीशी संवाद साधत त्यांना सहजपणे कार्यक्रमाशी बांधून घेण्याचे काम अभिनेत्री गिरीजा ओक गोडबोले यांच्या सूत्रसंचालनाने केले.

सूरमैफल..

एरव्ही पुरस्कार सोहळय़ात संगीताची मैफल अनुभवण्याचा योग विरळा. यंदा ‘लोकसत्ता तरुण तेजांकित पुरस्कार’ सोहळय़ाची सायंकाळ सुरांच्या मैफलीत न्हाऊन निघाली. वाद्यांतून झंकारणारे सूर आणि रसिकांच्या मनात उमटणारे गाण्यांचे बोल असा वेगळाच अनुभव ‘द म्युझिशियन्स’ या बॅण्डमुळे उपस्थितांना मिळाला. जुनी सदाबहार गाणी ही अनेकांच्या काळजाचा ठाव घेणारी गोष्ट. तीच अवीट गोडीची गाणी या वाद्यवृंदाने सादर केली. सत्यजित प्रभू, अमर ओक, महेश खानोलकर, नीलेश परब, दत्ता तावडे आणि आर्चिस लेले यांनी विविध वाद्यांवर वाजवलेली गाणी आणि अभिनेता पुष्कर श्रोत्रींच्या निवेदनात बांधलेली ही सूरमयी मैफल रसिकांची दाद मिळवून गेली. बासरीवादक अमर ओक यांच्या भूपाळीने या मैफलीची सुरूवात झाली.

ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांची गाणी व्हायोलिनवर वाजवण्यासाठी ओळखले जाणारे महेश खानोलकर यांनी ‘गोरी गोरी पान.. फुलासारखी छान’ हे गाणे व्हायोलिनवर सादर केले. तर सत्यजित प्रभू यांच्या हार्मोनियमने कजरा मोहब्बतवालाचा..ठेका धरला. अमर ओक यांची बासरी आणि नीलेश परब यांनी दक्षिण आफ्रिकी वाद्याच्या तालावर वाजवलेले ‘तनहाई.. ’ हे गाणे रंगले. दत्ता तावडे यांनी ‘आ जा आ जा’चे सूर छेडत एक वेगळाच उत्साह निर्माण केला. सहा वादक आणि त्यांनी वाजवलेल्या वाद्यांच्या जुगलबंदीची सांगता अखेर ‘ज्वेल थीफ’ चित्रपटातील ‘होठों पे ऐंसी बात’ रंगवत झाली.

पुरस्कार विजेते

*विज्ञान – तंत्रज्ञान : डॉ. ऋता काळे, गणितज्ज्ञ डॉ. महेश काकडे

* कायदा, धोरण, राजकारण, सुशासन : सनदी अधिकारी निधी चौधरी, अभिजीत बांगर

* नवउद्यमी : अजिंक्य धारिया

* तंत्रज्ञान : गौरव सोमवंशी

*व्यवसाय : ओंकार कलवडे, समीर केळकर

* सामाजिक : ऋतुजा जेवे, विनायक हेगाणा

* क्रीडा : बॉक्सर अल्फीया पठाण, पॅरा बॅडिमटनपटू मानसी जोशी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

*कला – मनोरंजन : चित्रकार शिशिर शिंदे, निर्माती – दिग्दर्शिका मनवा नाईक, दिग्दर्शक-अभिनेता सारंग साठय़े, दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे