मुंबई : व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेबाबत विद्यार्थी अनभिज्ञ होते. त्यामुळे दोन वेळा घ्यावी लागलेली प्रवेश परीक्षा, त्यानंतर दोन महिन्यांनी सुरू केलेली प्रवेश प्रक्रिया आदी कारणांमुळे व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या बीबीए / बीएमएस आणि संगणक उपयोजन पदवी (बीसीए), तर भारतीय औषधनिर्माण परिषदेने (फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया) महाविद्यालयांच्या मान्यतेची प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्याने औषधनिर्माणशास्त्र पदवी (फार्मसी) अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला विद्यार्थ्यांकडून फारसा प्रतिसाद मिळू शकलेला नाही. बीबीए/बीएमएस, बीसीए या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या दोन फेऱ्यांनंतर सुमारे ३० टक्के, तर फार्मसीच्या पहिल्या फेरीत केवळ २७ टक्के प्रवेश झाले आहेत.

व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या बीबीए / बीएमएस आणि संगणक उपयोजन पदवी (बीसीए) या अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. मात्र यंदा प्रथमच या अभ्यासक्रमाचे प्रवेश राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून करण्यात आले. त्यासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. मात्र अनेक विद्यार्थी व पालकांना याबाबत कल्पनाच नव्हती. परिणामी, विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले होते. विद्यार्थी व पालकांच्या मागणीनुसार या अभ्यासक्रमांची दोन वेळा प्रवेश परीक्षा घेण्यात आली. दोन वेळा प्रवेश परीक्षा घेण्यात आल्यानंतर प्रवेश प्रक्रियेस तब्बल दोन महिने विलंब झाला. याचा परिणाम या अभ्यासक्रमाच्या प्रवेशावर झाला आहे. बीबीए/बीएमएस आणि संगणक उपयोजन पदवी (बीसीए) या अभ्यासक्रमांच्या आतापर्यंत दोन फेऱ्या झाल्या आहेत. पहिल्या फेरीत बीबीए/बीएमएससाठी ११ हजार २९५ विद्यार्थ्यांनी, तर बीसीएसाठी १२ हजार ५७६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. दुसऱ्या फेरीमध्ये बीबीए / बीएमएससाठी अवघ्या ४ हजार ४४७ , तर बीसीएसाठी ४ हजार ९३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. दोन फेऱ्यानंतर बीबीए / बीएमएस या अभ्यासक्रमांच्या ५६ हजार ९३९ जागांपैकी १५ हजार ७७२ जागांवर प्रवेश झाले असून, हे प्रमाण एकूण जागेच्या २७.७० टक्के इतके आहे. बीसीएच्या ४८ हजार १२६ जागांपैकी १६ हजार ६६९ इतक्या जागावर प्रवेश झाले असून, हे प्रमाण ३४.६४ टक्के इतके आहे.

हेही वाचा – वैद्यकीय विमा योजनेत मुंबई महापालिकेची सापत्न वागणूक, खर्चावरील मर्यादा निश्चितीमुळे कर्मचारी नाराज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बीबीए/बीएमएस व बीसीए अभ्यासक्रमांप्रमाणे औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रवेशालाही अल्प प्रतिसाद मिळत आहे. भारतीय औषधनिर्माण परिषदेने मान्यता प्रक्रिया पूर्ण झालेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानुसार औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाची पहिली फेरी १४ ऑक्टोबर रोजी संपली. या फेरीसाठी २७ हजार ६१ विद्यार्थ्यांची निवड झाली. या विद्यार्थ्यांना ११ ते १४ ऑक्टोबर या काळात प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा होता. मात्र निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी केवळ १२ हजार ५८८ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला असून, हे प्रमाण एकूण जागांच्या २७.०६ टक्के इतके आहे.

हेही वाचा – मुंबईत येणाऱ्या विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी

विद्यार्थ्यांचा मिळालेला प्रतिसाद

अभ्यासक्रम – जागा – झालेले प्रवेश

बीबीए/बीएमएस – ५६९३९ – १५७७२

बीसीए – ४८१२६ – १६६६९

बी. फार्मसी – ४६५१२ – १२५८८