मरोशी ते रुपारेल या महत्त्वाकांक्षी जलबोगदा प्रकल्पाचा वाकोला ते रुपारेल महाविद्यालयादरम्यानचा दुसरा टप्पा पूर्ण झाला असून गुरुवार, २० फेब्रुवारी रोजी त्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. पाणीगळती, पाणीचोरी रोखून विनाखंडित पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट असलेल्या या प्रकल्पाच्या अखेरच्या टप्प्याचे काम सुरू आहे.
मरोशी ते रुपारेल जलबोगदा प्रकल्पाला १७ सप्टेंबर २००७ रोजी सुरुवात करण्यात आली. ५७५ कोटी रुपयांचा हा प्रकल्प १४ ऑगस्ट २०१४ रोजी पूर्ण होण्याची मुदत निश्चित करण्यात आली आहे. मरोशी, वाकोला, माहीम आणि रुपारेल महाविद्यालयाजवळ ९ मीटर व्यासाच्या विहिरी खोदणे, १२,२७६ मीटर लांबीचा व ३.६ मीटर व्यासाचा बोगदा जमिनीखाली सुमारे ६० मीटर खोल यंत्राच्या सहाय्याने खोदणे तसेच बोगद्यावर ३० सेंटीमीटर जाडीचे काँक्रिट अस्तरीकरण करण्याचे काम पूर्ण झाले आहे. या चारही विहिरी बोगद्याद्वारे अस्तित्वात असलेल्या मुख्य जलवाहिन्यांना जोडणे, झडपा बसवणे, के पूर्व आणि एच पूर्व विभागातील जलवाहिन्या एकमेकांना जोडणे, नियंत्रण कक्ष आमि इतर कामांचाही प्रकल्पात अंतर्भाव आहे.
यातील मरोशी- वाकोला हा ५.८ किलोमीटर लांबीचा जलबोगदा पहिल्या टप्प्यात मे २०१३ मध्ये पूर्ण झाला आहे. वाकोला- माहीम- रुपारेल महाविद्यालय हा दुसऱ्या टप्प्यातील ६.४ किलोमीटर लांबीचा बोगदाही आता पूर्ण झाला आहे. के पूर्व, एच पूर्व आणि जी उत्तर विभागातील जलवाहिन्या जोडण्याचे काम सुरू आहे. या बोगद्यामुळे पाणीपुरवठा विना अडथळा, अखंडित व प्रदूषण विरहित करता येईल तसेच एच पूर्व, के पूर्व, एच पश्चिम विभागातील काही भाग, जी उत्तर व दक्षिण आणि मुंबई शहरातील दक्षिण पश्चिम विभागातील मलबार टेकडी टेकडी जलाशयातून होणाऱ्या पाणीपुरवठय़ात सुधारणा होईल. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने ३५ टक्के, राज्य सरकारचे १५ टक्के व महानगरपालिकेने ५० टक्के रक्कम खर्च केली आहे.