सरकारने प्राध्यापक पदाची भरती बंद केल्याचा परिणाम ; अनेक तरुण बेरोजगार

वय वर्ष फक्त ३२. पाच विषयांमधील पदव्युत्तर पदवी. ‘सेट’ ‘नेट’ आणि शिक्षणातील शेवटची पदवी समजली जाणारी ‘पीएचडी’ही मिळालेली. महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदी तासिका तत्त्वांवर नोकरी आणि वेतन फक्त महिना ६ हजार ७२० रुपये. राज्यामध्ये प्राध्यापक पदाच्या हजारो जागा शिल्लक असताना सरकारने २०११ पासून जाहिरात न काढल्याने अनेक पीएचडीधारकांना तुटपुंज्या पगारात काम करावे लागत आहे. त्यातून मिळणाऱ्या अतिशय तुटपुंज्या वेतनावर घरचा खर्च सोडाच स्वत:चा खर्चही भागवता येत नाही. त्यामुळे अनेक पीएचडीधारक विद्यार्थी सुरक्षारक्षक, दुकानदार, हॉटेलमध्ये वेटर म्हणून किंवा जगण्यासाठी जे जमेल ते काम करत आपला उदरनिर्वाह करत आयुष्य कंठत आहेत.

१९८० ते ८५ या काळात जे शिक्षक प्राध्यापक म्हणून रुजू झाले ते आता निवृत्त होण्याच्या मार्गावर आहेत. या शिक्षकांची संख्या मोठी आहे. मात्र सरकारच्या खासगीकरणाऱ्या धोरणामुळे निवृत्त झालेल्या प्राध्यापकांच्या जागेवर नव्याने भरती करण्यात येत नाही. परिणामी रिकाम्या झालेल्या जागेवर पीएचडी, नेट, सेट झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांची नियुक्ती केली जाते. ती तासिका तत्वांवर असते. त्यामुळे जो प्राध्यापक निवृत्त होताना साधारण १ लाख ८३ हजार पगार घेतो, त्याच जागी या गुणवंत विद्यार्थ्यांची फक्त सहा ते सात हजार रुपयांवर बोळवण केली जाते. राज्यामध्ये प्रत्येक महाविद्यालयामध्ये सरासरी २५ किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षक सीएचबीवर काम करतात. त्यामुळे राज्यातील सीएचबीवर किंवा अन्य तत्सम काम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

पीएचडीपर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी कर्ज काढतात. मात्र पीएचडीनंतरही भविष्याची ‘सोय’ करणारी नोकरी मिळत नसल्याने अनेक कुटुंबामध्ये ताणतणावाचे वातावरण निर्माण झाल्याची भीती अनेक विद्यार्थ्यांनी  ‘लोकसत्ताशी’ बोलताना व्यक्त केली.

आईवडील शेती करतात. चांगले शिक्षण मिळाले की, चार पैसे घरी येण्याची अपेक्षा होती. घराला आलेल्या पैशांचा, गरिबीचा वांझोटापणा संपेल. खचखळग्याच्या, दिवस रात राबलेल्या हातांना सुखाने दोन घास खाता येतील, अशी साधी अपेक्षा ठेवून कष्ट्राने शिक्षण घेतले. मात्र आज ८ वर्षे झाली तरी अतिशय कमी वेतनावर तासिका तत्वांवर काम करत आहे. एवढे शिक्षण घेतले हे लोकांमध्ये सांगायला लाज वाटते. जो व्यक्ती स्वत:च्या गरजा पूर्ण करू शकत नाही, तो आईवडिलांनी पाहिलेली स्वप्न कशी पूर्ण करणार. सध्या शिक्षणाची किंमत शून्य आहे. सरकार देशाचे भवितव्य असलेल्या तरुणांशी खेळत असल्याचे दिसून येते.

– पीएचडीप्राप्त विद्यार्थी

कर्ज काढून गरजा भागतात

एमफील करताना आणि पीएचडीचे शिक्षण घेताना एटीएमवर रात्री सुरक्षारक्षक म्हणून काम करायचो. आणि त्यानंतर दिवसभर अभ्यास. आता एका कॉलेजमध्ये शिकवण्याचे काम करतोय. मात्र येणारा पगार तीन महिन्यांमधून एकदा मिळतो. त्यामुळे कर्ज काढून दैनंदिन गरजा भागवाव्या लागतात. आणि मिळालेल्या पैशात कर्जाचे पैसे भागवले जातात.

– तासिका तत्वावरील शिक्षक

लग्नासाठी वधु मिळेना

तासिका तत्वांवर काम करताना अतिशय कमी पगार मिळतो. तसेच पीएचडी केल्यामुळे वय वाढलेले असते. लग्नासाठी मुली पहायला गेले तर पहिला पगार विचारला जातो. तुम्ही कायमस्वरुपी नोकरी करता का? असे विचारले जाते. मुलीचे पालक  कमी शिकलेली मुलगीही लग्नासाठी द्यायला तयार नसल्याने लग्न करण्यासाठी वधू आणायची कुठून असा प्रश्न निर्माण झाला आहे. अगदी ३८ ते ४० वर्षांपर्यंत वाट पाहूनही लग्न न झालेली पीएचडी झालेली मुले सध्या सरकार भरती उठवेल आणि लग्न होईल, या प्रतिक्षेत आहेत.

ते जगतात असे..

* महिन्याला ६ हजार ७५० रुपये वेतन

* उत्तरपत्रिका तपासणे

* महाविद्यालयांमधील इतर कामे करणे

* घरून दिलेले पैसे वापरणे

* खासगी शिकवणी घेणे

* इतर जोडधंदे करणे, उदा. वाहन चालक, स्टेशनरी दुकान, रस्त्यावर पुस्तके विकणे, कपडे इस्त्री करून देणे

पीएच. डी, नेट, सेट होऊन जे विद्यार्थी तासिका तत्वांवर काम करतात त्यांचे मानधन वाढवून देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. अर्थखात्याशी त्यासंदर्भात चर्चा करून येत्या अधिवेशनापूर्वी अंतिम निर्णय घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल.                

 – विनोद तावडे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री