येत्या २६ व २७ जूनला ऊर्जाक्षेत्रावर विचारमंथन; केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन
‘लोकसत्ता’चा ‘बदलता महाराष्ट्र’ उपक्रम म्हणजे राज्याच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाचा वेध. या क्षेत्रांतील विविध पैलू, घटक, मुद्दे यांबाबतची तज्ज्ञांची, अभ्यासकांची, नेत्यांची मते जाणून घेऊन ती धोरणकर्त्यांपर्यंत पोचविणे हा या उपक्रमाचा हेतू. या अंतर्गत आजवर शेतीपासून उद्योगांपर्यंत आणि महिलांच्या प्रश्नांपासून धर्म या विषयापर्यंत अनेक परिसंवाद घेण्यात आले. यावेळी या उपक्रमाच्या नव्या पर्वात उलगडणार आहेत ‘ऊर्जेच्या प्रकाशवाटा’.
येत्या २६ व २७ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय चर्चासत्रांत राज्यासह देशातील ऊर्जाक्षेत्रावर विचारमंथन होणार आहे. केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार असून, समारोपप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत.
‘लोकसत्ता’ने ‘बदलता महाराष्ट्र’ उपक्रमाद्वारे विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चेसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्यात व्यक्त झालेली मते, मांडण्यात आलेल्या भूमिका या त्या-त्या वेळी लोकसत्तामधून प्रसिद्ध करण्यात आल्याच. त्याचबरोबर त्यांची पुस्तिकाही प्रकाशित करून, ती राज्याच्या निर्णयप्रक्रियेत सहभागी असणाऱ्या विविध मान्यवरांपर्यंत पोचविण्यात आली. राज्याच्या धोरणआखणीमध्ये या विचारमंथनाचा सकारात्मक परिणाम व्हावा हे त्याचे उद्दिष्ट. यापूर्वी पाणी, शिक्षण, उद्योग, पर्यावरण, पायाभूत सुविधा, स्टार्टअप्स अशा विविध विषयांवर या चर्चासत्रांत विचारमंथन झाले. यावेळचा विषय आहे ऊर्जा.
दैनंदिन जीवनात ऊर्जेचे महत्त्व अनन्यसाधारण असून, अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांइतकीच ती महत्त्वाची गरज बनली आहे. त्यामुळे या उपक्रमात सहा सत्रांमध्ये ऊर्जाक्षेत्रातील विविध पैलूंवर तज्ज्ञांकडून सखोल चर्चा करण्यात येणार आहे. त्यात ऊर्जाक्षेत्रातील सद्य:स्थिती आणि आव्हाने, वीजक्षेत्राचे नियमन, ऊर्जानिर्मितीचे पर्यायी मार्ग, या क्षेत्रातील कायदे, नियम आणि दर यांचे सामान्य ग्राहकावर होणारे परिणाम अशा विविध विषयांवर या क्षेत्रातील तज्ज्ञ विचार मांडणार आहेत. राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी ऊर्जामंत्री दिलीप वळसे-पाटील, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंग, जैन इरिगेशन्सचे ए. बी. जैन यांच्यासह इतर मान्यवर या चर्चासत्रांत सहभागी होणार आहेत.
एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड, एनकेजीएसबी को-ऑप बँक लिमिटेड आणि रिजन्सी ग्रुप हे या कार्यक्रमाचे सहप्रायोजक असून, हा कार्यक्रम ‘पॉवर्ड बाय’ केसरी आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आहे.