मुंबई : भारताच्या पहिल्या ‘जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन’ (वेव्हज्) शिखर परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे होणार आहे. या परिषदेचे यजमानपद महाराष्ट्र शासन भूषवित आहे. ‘कनेक्टिंग क्रिएटर्स, कनेक्टिंग कंट्रीज’ या घोषवाक्याखाली होणाऱ्या या चार दिवसीय शिखर परिषदेत भारताला मीडिया, मनोरंजन आणि डिजिटल नवप्रवर्तनाचे जागतिक केंद्र म्हणून प्रदर्शित करण्यात येईल.

पंतप्रधान मोदी यांच्या सर्जनशीलता, तंत्रज्ञान आणि प्रतिभेच्या एकत्रीकरणाच्या दृष्टीकोनाशी सुसंगत असलेल्या या ‘वेव्हज् २०२५’ मध्ये चित्रपट, ओटीटी, गेमिंग, कॉमिक्स, डिजिटल मीडिया, कृत्रिम बुद्धिमत्ता, एव्हीजीसी- एक्सआर ब्रॉडकास्टिंग आणि नव्या तंत्रज्ञानाचा समावेश असेल. देशाच्या मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रातील सामर्थ्याचे हे सर्वांगीण प्रदर्शन असेल. या उपक्रमाच्या माध्यमातून २०२९ पर्यंत ५० अब्ज डॉलर्सच्या बाजारपेठेचे दरवाजे उघडले जातील, असा अंदाज आहे.

शिखर परिषदेत प्रथमच ग्लोबल मीडिया डायलॉग (जीएमडी) चे आयोजन मुंबईत होणार आहे. यामध्ये २५ देशांचे मंत्री सहभागी होणार असून, भारताच्या जागतिक मीडिया क्षेत्रातील सहभागात हा एक ऐतिहासिक टप्पा ठरेल. या परिषदेत पंतप्रधान मोदी ‘क्रिप्टोस्पियर’ला भेट देऊन ‘क्रिएट इन इंडिया’ उपक्रमांतर्गत निवड झालेल्या सर्जनशील कलाकारांशी संवाद साधणार आहेत. याशिवाय, ते भारत पॅव्हिलियन, महाराष्ट्र पॅव्हेलियनला देखील भेट देतील. परिषदेच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशीष शेलार आदी मान्यवर या उपस्थित राहणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हेवज् परिषदेत काय? परिषदेसाठी एक लाखांहून अधिक नोंदणी झाली. ‘वेव्हज् २०२५’ परिषदेमध्ये ९० हून अधिक देश, १०००० प्रतिनिधी, १००० कलाकार, ३०० हून अधिक कंपन्या आणि ३५० हून अधिक स्टार्टअप्स सहभागी होणार आहेत. शिखर संमेलनात ४२ मुख्य सत्रे, ३९ विशेष सत्रे आणि ३२ मास्टरक्लासेस आयोजित करण्यात येणार आहेत, ज्यामध्ये ब्रॉडकास्टिंग, इन्फोटेन्मेंट, एव्हीजीसी-एक्सआर चित्रपट आणि डिजिटल मीडिया यांसारख्या विविध क्षेत्रांचा समावेश असेल.