मुंबई : बारसू येथे प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्पाविरोधातील आंदोलकांवर पोलीसबळाचा वापर केला जाणार नाही. तसेच शेतकऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय आणि त्यांच्या सर्व शंकांचे निरसन झाल्याशिवाय हा प्रकल्प पुढे रेटणार नाही, असे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सोमवारी दिले.

बारसू प्रकल्पाच्या संदर्भात सामंत यांनी शरद पवार यांची भेट घेऊन शासनाची भूमिका मांडली. बारसू आंदोलकांनी रविवारी शरद पवार यांची भेट घेऊन वस्तुस्थिती मांडली होती. त्या वेळी पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री सामंत यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता सामंत यांनी पवारांची भेट घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार सामंत यांनी पवार यांची त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी भेट घेतली. या वेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. बारसू तेलशुद्धीकरण प्रकल्पासंदर्भात आंदोलकांच्या मनात काही गैरसमज वा शंका आहेत. त्यांचे  निरसन झाल्याशिवाय हा प्रकल्प पुढे रेटला जाणार नाही, असे आश्वासन शासनाच्या वतीने आपण शरद पवार यांना दिले. मुख्यमंत्री शिंदे यांचा संदेश घेऊनच आपण पवारांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या मनात काही शंका आहेत. त्या कशा दूर करता येतील याबाबत पवारांशी सविस्तर चर्चा झाली. शेतकऱ्यांवर अन्याय करून हा प्रकल्प पुढे रेटला जाणार नाही, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

cm eknath shinde lok sabha marathi news, thane lok sabha marathi news
विश्लेषण: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यावर भाजप नेते हक्क का सांगतात? भाजपच्या रेट्यासमोर शिंदेसेनेची कोंडी?
Neelam Gorhe criticize Uddhav Thackeray said he has lost his base politically
“उद्धव ठाकरे यांचा राजकीयदृष्ट्या जनाधार संपला,” निलम गोऱ्हे यांची टीका; म्हणाल्या…
Eknath Shinde, Eknath Shinde group
सरकारच्या कामांचा लेखाजोखा मांडत शिंदे गटाचा प्रचार
raju shetty allegations against dhairyasheel mane over development work
खासदारांचे विकासकामात गौडबंगाल, इतरांची कामे आपल्या नावावर खपवली; राजू शेट्टी यांचा धैर्यशील माने यांच्यावर आरोप

आंदोलकांनी रविवारी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांची बाजू मांडली होती. त्यावर सरकारची भूमिका काय आहे, हे पवारांच्या निदर्शनास आणून दिले. जोरजबरदस्ती करून हा प्रकल्प रेटला जाणार नाही. सध्या फक्त मातीचे परीक्षण केले जात आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यावर तेलशुद्धीकरण प्रकल्प व्यवहार्य आहे का, याचा निर्णय संबंधित कंपनी घेईल. यामुळे प्रकल्पाचे काम सुरू झाले, हा गैरसमज दूर करा, असे आवाहन सामंत यांनी केले.

चर्चेची तयारी असेल तरच नोटिसा मागे घेऊ

आंदोलकांना बजावलेल्या नोटिसा मागे घेण्याची मागणी केली जात आहे; पण शासनाशी चर्चा करण्यासाठी पुढे आल्याशिवाय नोटिसा मागे घेतल्या जाणार नाहीत. त्याबाबतची वस्तुस्थिती पवारांच्या निदर्शनास आणून दिली आहे, असे सामंत यांनी स्पष्ट केले. शरद पवार यांची भूमिका काय आहे, या प्रश्नावर, ‘‘पवारांना त्यांची भूमिका विचारण्याएवढा मी मोठा नाही; पण सरकारची भूमिका त्यांच्या कानावर घातली आहे,’’ असे सामंत यांनी सांगितले. शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या शंका दूर केल्याशिवाय हा प्रकल्प पुढे जाणार नाही, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. तसे आश्वासन सरकारच्या वतीने पवारांना देण्यात आले. आंदोलनकर्त्यांनाही आमचा हाच संदेश आहे. – उदय सामंत, उद्योगमंत्री