पीएमसी बँक घोटाळा, माजी भाजपा आमदाराच्या मुलाला अटक

पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शनिवारी रणजीत सिंग यांना अटक केली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शनिवारी रणजीत सिंग यांना अटक केली आहे. रणजीत सिंग पीएमसी बँकेचे माजी संचालक आहेत तसेच माजी भाजपा आमदार तारा सिंग यांचे पुत्र आहेत. ४,३५५ कोटी रुपयांच्या पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात या आठवडयाच्या सुरुवातीला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दोन ऑडीटर्सना अटक केली होती.

पीएमसी बँकेत घोटाळा झाला तेव्हा जयेश संघानी आणि केतन लकडावाला स्टॅट्युटरी ऑडिटर होते. या घोटाळयात बँकेचे बडे अधिकारी गुंतले आहेत. बँकेत झालेल्या अनियमितता झाकण्यामध्ये जयेश आणि केतन या दोघांनी महत्वाची भूमिका बजावल्याचा संशय आहे. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. यामध्ये एचडीआयएल कंपनीचे प्रवर्तक आणि बँकेच्या बडया अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

४,३५५ कोटी रुपयांचा हा घोटाळा समोर आल्यानंतर आरबीआयने पीएमसी बँकेवर निर्बंध आणले. ज्याचा फटका खातेदारांना बसला. आरबीआयने बँकेतून पैसे काढण्यावर निर्बंध आणले. ज्यामुळे खातेदारांमध्ये घबराट निर्माण झाली. काही खातेदारांनी आपली आयुष्यभराची कमाई बँकेत ठेवली होती. या तणावामुळे काही खातेदारांचा मृत्यू सुद्धा झाला.

रणजीत सिंग यांचे वडील सरदार तारा सिंग भाजपाचे माजी आमदार आहेत. १९९९ पासून सलग चार वेळा निवडणूक जिंकून ते विधानसभेवर गेले होते. यंदा वयोमानामुळे त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता नव्हती. सरदार तारा सिंग आपला मुलगा रणजीत सिंगसाठी तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करत होते. पण भाजपाने मुलूंडमधून मिहिर कोटेचा यांना उमेदवारी दिली. आता मिहिर कोटेचा मुलुंडमधून आमदार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Police has arrested ranjeet singh in connection with pmc bank scam dmp