बांगलादेशातील अल्पवयीन मुलींना लग्नाचे वा नोकरीचे आमिष दाखवून भारतात बेकायदा आणण्यात आल्याचे प्रकार अनेकदा उघडकीस येतात. अशाच एका घटनेत एका मामा-भाच्याच्या जोडीने दोन अल्पवयीन मुलींना ठाण्यात आणून त्यांची विक्री करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांच्या चपळतेमुळे हे दोघेही जेरबंद झाले आणि वेश्याव्यवसायात ढकलल्या जाणाऱ्या या दोन मुलींची सुटका झाली.
ठाणे पोलिसांच्या अनैतिक मानवी तस्करी शाखेतील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दैनंदिन कामात व्यस्त होते. ६ डिसेंबर २०१७ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर आपल्या कार्यालयामध्ये काम करत असतानाच त्यांना एका खबरीने मोबाइलवरून महत्त्वाची माहिती दिली. लियान नावाचा बांगलादेशी नागरिक १६ ते १७ वर्षांच्या मुलीच्या विक्रीसाठी ग्राहकाच्या शोधात असल्याची माहिती खबरीने दिली होती आणि या माहितीसोबतच लियानचा मोबाइल क्रमांकही त्याने मिळवून दिला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रवींद्र दौंडकर यांनी तात्काळ वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला. या सापळ्यासाठी बोगस ग्राहक तयार करण्यात आला. या ग्राहकाने लियानच्या क्रमांकावर संपर्क साधून ७५ हजार रुपयांमध्ये मुलीचा सौदा पक्का केला. या व्यवहारासाठी पोलिसांनी नोटांच्या आकाराचे कागदाचे बंडल तयार केले आणि त्यावर वर-खाली पाचशे रुपयांची प्रत्येकी एक नोट ठेवली. ठरल्याप्रमाणे कळवा परिसरात दौंडकर यांच्या पथकाने सापळा रचला. पण, त्या ठिकाणी लियान ठरलेल्या वेळेस पोहचला नाही. त्यामुळे बोगस ग्राहकाने मोबाइलवरून त्याच्याशी संपर्क साधला. पण, त्याचा मोबाइल बंद येत होता. अखेर दुसऱ्या मोबाइल क्रमांकावरून लियान याने त्या बोगस ग्राहकाशी संपर्क साधला. मोबाइलची बॅटरी उतरल्यामुळे त्याने मामाच्या मोबाइलवरून कॉल केला होता. काही क्षणांतच तो मामासोबत ठरलेल्या ठिकाणी पोहोचला आणि तिथेच पोलिसांच्या पथकाने मामा-भाच्याला ताब्यात घेतले. त्यांच्यासोबत विक्रीसाठी आणलेली ती पीडित अल्पवयीन मुलगीही होती. या मुलीची सुटका करून पथकाने तिला उल्हासनगरच्या बाल कल्याण केंद्रामध्ये ठेवले. लियान ऊर्फ सौरभ नुर इस्लाम मुल्ला (२०) आणि त्याचा मामा शोहाग मोहमद हबीब इस्लाम (२५) अशी आरोपींची नावे. या दोघांच्या चौकशीतून उघड झालेली माहिती धक्कादायक होती.
लियान आणि शोहाग हे दोघे मूळचे बांगलादेशचे रहिवासी असून हे दोघे नात्याने मामा-भाचे आहेत. बांगलादेशात वास्तव्यास असताना लियान याने एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. गेल्या वर्षभरापासून त्याचे तिच्यासोबत प्रेमसंबंध होते. यातूनच त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिला महिनाभरापूर्वी बंगळूरु येथील आत्याच्या घरी आणले होते. बंगळूरुमध्ये येण्यासाठी त्याने भारत आणि बांगलादेशाच्या सीमेवरून घुसखोरी केली होती. बंगळूरुमध्ये आणल्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर तिला वेश्या व्यवसायात ढकलले. त्यासाठी त्याची आत्या त्याला मदत करत होती. वेश्या व्यवसाय करण्यास नकार दिला म्हणून त्या मुलीला मारहाणही करण्यात येत होती. महिनाभरानंतर ग्राहकाच्या शोधात तो कळव्यात आला आणि तिथेच या मुलीची सुटका झाली. या प्रकरणात बंगळूरुमधील लियानची आत्या नीतू ऊर्फ शिल्पा संजय घोष ऊर्फ यास्मीन इलाही मुल्ला (२४) हिला अटक करण्यात आली. त्या वेळेस तिच्या घरातून आणखी एका पीडित तरुणीची सुटका करण्यात पोलिसांना यश आले. या तरुणीला शोहाग याने बांगलादेशामधून भारतात घुसखोरी करून आणले होते. फिरायला नेण्याच्या बहाण्याने भारतात आणून त्याने तिला वेश्या व्यवसायात ढकलले होते. चौकशीतून पुढे आलेल्या या माहितीमुळे पोलीसही चक्रावले होते मात्र, सीमेपलीकडच्या दोघींची सुटका केल्याचे समाधान त्यांच्या मनात अजूनही आहे. या दोघींना पुन्हा बांगलादेशामध्ये पाठविण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांशी पोलिसांनी संपर्कही केला आहे.