मुंबई : शिवडीतील टिकटॉक पाईन्ट येथे कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या महिलेच्या हत्येची उकल करण्यात शिवडी पोलिसांना यश आले आहे. सपना बातम (४०) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून पोलिसांनी याप्रकरणी आरोपी शेहजादा उर्फ रमजान शफी शेख (३७) याला अटक केली. टिकटॉक पाईन्टजवळील बीपीसीएल कंपनीचे पाठीमागे असलेल्या झुडपामध्ये २२ जानेवारी रोजी सकाळी पोलिसांना एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला होता. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठवला.
हेही वाचा >>> नवी मुंबईतील २०१५ नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश
डोक्यात प्रहार करून महिलेची हत्या करण्यात आल्याचे उघड होताच पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात हत्या आणि पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता आणि चेहराही ओळखता येत नव्हता. तसेच घटनास्थळी कमी वर्दळ असल्यामुळे पोलिसांना तिची ओळख पटविणे कठीण झाले होते. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोहित खोत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवडी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. वडाळा, यलोगेट पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांची एकूण आठ पथके तयार करण्यात आली.
हेही वाचा >>> आयुष्याच्या संध्याकाळी ज्येष्ठ नागरिकांचा आश्रयाचा हक्क महत्त्वाचा; उच्च न्यायालयाने केले स्पष्ट
पोलिसांनी सुरुवातीला १६२ हरवलेल्या महिलांची माहिती तपासली. त्यानंतर महिलेच्या मृतदेहावर असलेल्या ऐवजांच्या आधारे पोलिसांनी मृत महिला वारंगना किंवा रस्त्याच्याकडेला राहाणारी असल्याच्या शक्यतेतून शोध सुरू केला. २०० महिलांकडे चौकशी केल्यानंतर मृत महिला मुंबई सेंट्रल परिसरात राहात असल्याची महत्त्वपूर्ण माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे पोलिसांनी केलेल्या तपासात मृत महिलेचे नाव सपना असल्याचे निष्पन्न झाले. वडाळ्यातील रहिवासी आरोपी शेहजादा याने तिला दारू पाजण्याच्या बहाण्याने घटनास्थळी नेले. येथे दोघांमध्ये भांडण झाल्यानंतर शेहजादाने डोक्यात दगड घालून तिची हत्या केली. तिची ओळख पटू नये यासाठी शेहजादा याने तिचा चेहरा दगडाने ठेचला. नंतर सपनाचा मृतदेह प्लास्टिकने झाकून त्यावर लाकडी फळ्या टाकून तो तेथून पसार झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.