scorecardresearch

प्रदूषणामुळे २०२१ मध्ये मुंबईतील ९१०० नागरिकांचा मृत्यू

जगातील ६,४७५ प्रदूषित शहरांमध्ये मुंबई १२४व्या स्थानावर आहे. ‘आयक्यू एअर’ या संस्थेने मंगळवारी जाहीर केलेल्या २०२१च्या ‘जागतिक हवा गुणवत्ता अहवाला’तून समोर आले आहे.

जगातील ६४७५ प्रदूषित शहरांमध्ये मुंबई १२४व्या स्थानावर, भिवंडी सर्वाधिक प्रदूषित

मुंबई : जगातील ६,४७५ प्रदूषित शहरांमध्ये मुंबई १२४व्या स्थानावर आहे. ‘आयक्यू एअर’ या संस्थेने मंगळवारी जाहीर केलेल्या २०२१च्या ‘जागतिक हवा गुणवत्ता अहवाला’तून समोर आले आहे. मुंबईत २०२०च्या तुलनेत २०२१ या वर्षांत ‘पीएम २.५’चे (२.५ मायक्रोमीटर व्यासाचे घातक सूक्ष्मकण) प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी, २०२१ मध्ये ९,१०० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 

 मुंबईत २०२० या वर्षांत ४१.३ मायक्रोग्रॅम घनमीटर एवढे ‘पीएम २.५’चे प्रमाण होते. त्यात वाढ होऊन २०२१ साली हे प्रमाण ४६.४ मायक्रोग्रॅम घनमीटर एवढे झाले. त्यामुळे मुंबई हे जगातील ६,४७५ प्रदूषित शहरांपैकी १२४व्या क्रमांकाचे शहर ठरले आहे. नवी मुंबई ही मुंबईपेक्षा अधिक प्रदूषित असून ७१व्या स्थानी आहे. चंद्रपूर ११३व्या, पुणे १९६व्या, नाशिक २१५व्या स्थानी आहे.

 ‘जागतिक आरोग्य संघटने’ने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ५ मायक्रोग्रॅम घनमीटर हे ‘पीएम २.५’चे आदर्श प्रमाण आहे. महाराष्ट्रातील शहरांतील प्रदूषण यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक आहे. वायुप्रदूषणाचा परिणाम म्हणून २०२१ या वर्षांत मुंबईतील ९ हजार १०० नागरिकांचा मृत्यू झाला असून वायुप्रदूषणाच्या परिणामांवर १ अब्ज ३० कोटी अमेरिकी डॉलर खर्च झाला आहे.

ल्ल ‘आयक्यू एअर’ने जगभरातील ६,४७५ प्रदूषित शहरांची क्रमवारी जाहीर केली आहे. त्यानुसार राजस्थानातील भिवंडी हे शहर जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर आहे. येथे ‘पीएम २.५’चे प्रमाण १०६.२ मायक्रोग्रॅम घनमीटर आहे.

देशाची स्थिती

ल्ल जगभरातील देशांच्या राजधान्यांचा विचार करता नवी दिल्ली ही पहिल्या क्रमांकाची प्रदूषित राजधानी आहे. येथे ‘पीएम २.५’चे प्रमाण ८५ मायक्रोग्रॅम घनमीटर आहे.

ल्ल संपूर्ण देशाचा विचार करता भारतात २०२१ या वर्षांत ५८.१ मायक्रोग्रॅम घनमीटर एवढे ‘पीएम २.५’चे प्रमाण होते. त्यामुळे भारताचा क्रमांक जगात पाचवा ठरला आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pollution kills mumbai residents mumbai polluted cities bhiwandi polluted amy

ताज्या बातम्या