मुंबई : श्रावणात ऊन-पावसाचा लपंडाव सुरू होताच मुंबई-ठाण्यासह समस्त महाराष्ट्रात दहीहंडी, गणेशोत्सवाचे वेध लागतात. उत्सवप्रेमी मंडळी रात्रीचा जागर करीत उत्सवांच्या तयारीला लागतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून उत्सवपूर्व अतिउत्साह नव्या प्रथांमुळे उत्सवांचा मूळे हेतूच हरवला जात आहे. नारळी पौर्णिमेच्या मुहूर्तावर चोर गोविंदा, गणेशोत्सवापूर्वी महिनाभर आधी पाऊल पूजन, पाट पूजन, गणेश आगमनाचे निमित्त साधून यंत्रणांना वेठीस धरण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. यामुळे वाहतूक कोंडी, कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले आहेत.

श्रावणसरी बरसू लागताच मुंबई-ठाण्यासह सर्वत्र गोकुळाष्टमी, गणेशोत्सव, त्यामागून येणारा नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू होते. ठिकठिकाणची लहान-मोठी गोविंदा पथके रात्री उशिरापर्यंत जागून उंच थर रचण्याचा सराव करू लागली आहेत. लहान-मोठी गोविंदा पथके गोपाळकाल्याच्या दिवशी ठिकठिकाणी मानाची दहीहंडी फोडण्यासाठी मुंबई-ठाण्यात संचार करीत असतात. मात्र काही गोविंदा पथके नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून परिचयाच्या पथकांसाठी आपल्या परिसरात मानाची दहीहंडी बांधू लागले असून हा प्रकार ‘चोर गोविंदा’ म्हणूनच परिचित झाला आहे. नारळी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळनंतर या उत्सवाला रंग चढतो. काही वर्षांपूर्वी मोजकीच गोविंदा पथके आपल्या परिचित पथकांसाठी नारळी पौर्णिमेला मानाची दहीहंडी बांधत होती. परंतु आता हे लोण मुंबईसह ठाण्यातही पसरले आहे. आता काही मोजकीच नव्हे तर परिसरातील लहान-मोठी गोविंदा पथके पारितोषिकाच्या आमिषापोटी नारळी पौर्णिमेच्या दिवशी चोर गोविंदा काढून कमाई करू लागली आहेत. त्यामुळे मुंबई-ठाण्यात नारळी पौर्णिमेच्या दिवशी रात्री वाहतुकीचे तीनतेरा वाजू लागले आहेत. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलिसांवर बंदोबस्ताचा अतिरिक्त ताण येऊ लागला आहे.

पूर्वी श्रावण महिना सुरू होताच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील पदाधिकाऱ्यांची लगबग सुरू होत होती. हळूहळू देखावे साकारण्याचे निमित्त पुढे करीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेश चतुर्थीपूर्वी महिनाभर आधीच गणेशमूर्ती वाजतगाजत मंडपस्थळी आणण्यास सुरुवात केली आहे. पूर्वी गणेशमूर्ती आधीच मंडपस्थळी आणणाऱ्या मंडळांची संख्या फारच कमी होती. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये बहुसंख्य मंडळांनी ही नवीच प्रथा सुरू केली आहे. त्याचबरोबर गणेशमूर्ती घडविण्यापूर्वी पाऊल पूजन, पाट पूजन आदी सोहळ्यांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यास सुरुवात झाली आहे. कर्णकर्कश आवाजात वाजणारी गाणी, अचकट विचकट नृत्य करणारी तरुणाई यामुळे पुन्हा उत्सवाचा मूळ उद्देश हरवण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. एकूणच परिस्थिती लक्षात घेता उत्सवापूर्वीचा उन्माद वाढू लागला असून त्यामुळे वाहतूक कोंडी, छोटे-मोठे अपघात, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे वाहतूक पोलीस, स्थानिक पोलिसांवर प्रचंड ताण येऊ लागला आहे.

एकेकाळी रोंबासोंबा संस्कृतीमुळे गणेशोत्सव वेगळ्याच दिशेला भरकटू लागला होता. त्यावेळी जनजागृतीच्या माध्यमातून उत्सवाचे पावित्र्य टिकविण्यात यश आले. मुंबईमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सामाजिक बांधिलकी जपून उत्सव साजरा करीत आहेत. हेच भान जपून गणेशोत्सव मंडळांनी भविष्यात उत्सव साजरा करायला हवा.- ॲड. नरेश दहिबावकर, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती