बंद कंपनीच्या इमारतीत लपल्याची शक्यता

मुंबई : अंधेरी-कुर्ला रस्त्यावरील जेबीनगर येथे एका बंद कंपनीच्या रिकाम्या इमारतीत बिबटय़ा लपल्याची शक्यता असून रविवारी सकाळपासून इमारतीच्या परिसरात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून शोध सुरू आहे. लावेलल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये त्याचे अस्तित्व अद्याप दिसलेले नाही.

रविवारी सकाळी जेबीनगर येथील एका कंपनीच्या संरक्षक भिंतीवरून बिबटय़ाने उडी मारल्याचे तेथील सुरक्षारक्षकाने पाहिले. ही इमारत बंद पडलेल्या कंपनीच्या रिकाम्या इमारतीजवळच आहे. त्यानंतर वन विभागाने तातडीने धाव घेतली. बंद कंपनीच्या रिकाम्या इमारतीत हा बिबटय़ा लपल्याची शक्यता उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर यांनी व्यक्त के ली. कंपनीचा परिसर सुमारे १२ एकरचा आहे.

सध्या या ठिकाणी पाच कॅमेरा ट्रॅप आणि तीन पिंजरे लावण्यात आले आहेत. मात्र सकाळपासून अद्याप एकाही कॅमेऱ्यामध्ये बिबटय़ाची छबी उमटली नसल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली.  मात्र लवकरच त्यास पकडण्यात यश येईल असे सांगितले.

मात्र हा बिबटय़ा इतक्या भर वस्तीत कसा आला असावा त्याबद्दल अद्यापही ठोस माहिती मिळू शकली नाही. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या येण्यानंतर या भागात शनिवारी रात्री ‘आम्हीपण बिबटय़ा पाहिला’ अशा चर्चा होऊ लागल्या. मात्र रविवारी सकाळी कंपाऊडवरील बिबटय़ाच्या नखांच्या खुणा स्पष्ट असल्याचे सूत्रांनी सांगितले.

जवळचा बिबटय़ाचा अधिवास असलेल्या आरेपासून हे अंतर सुमारे तीन ते साडेतीन किमी इतके आहे. आरेनंतर सुरुवातीचा काही भाग सोडल्यास वस्ती, औद्योगिक क्षेत्र अशा बऱ्याच वसाहती आहेत. त्यातून हा बिबटय़ा येथेपर्यंत कसा पोहचला असेल याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. बिबटय़ा या भागात महिनाभरापासून असावा आणि रिकाम्या इमारत परिसरात भटकणारे कुत्रे हे त्याचे खाद्य असावे अशी शक्यता व्यक्त के ली जात आहे.

दरम्यान दोन वर्षांपूर्वी मरोळ येथून एका बिबटय़ाला पकडण्यात आले होते. त्यानंतर त्यास संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले. तर सुमारे आठ महिन्यांपूर्वी एका इमारतीच्या सुरक्षारक्षकाने बिबटय़ाने पकडलेल्या कुत्र्यास सोडविण्याचा प्रयत्न के ल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. सध्या जेबीनगर येथे लपलेला बिबटय़ा हाच असावा का? असा तर्क व्यक्त केला जात आहे, मात्र याबाबत ठोस पुरावा अद्याप उपलब्ध झाला नाही.