मुंबई : काही दिवसांपासून मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्याच्या धमक्या पोलिसांना येत आहेत. गर्दीच्या ठिकाणी घातपात घडण्याची शक्यता लक्षात घेऊन मंगळवारी रेल्वे पोलीस आणि आरपीएफ जवानांनी लोकमान्य टिळक टर्मिनवर सराव कवायत करण्यात आली.
हेही वाचा : ‘हॉटेल द ललीत’मध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी; पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी
काही दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे एका अनोळखी बोटीत मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडला होता. तीन दिवसांपूर्वी वाहतूक पोलिसांना मुंबईत २६/११ सारखा दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देण्यात आली होती. तर सोमवारी मुंबईतील प्रसिद्ध हॉटेल द ललीतमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी अज्ञात इसमाने फोनवरून दिली. वारंवार धमक्या येत असल्याने मुंबई पोलीस सतर्क झाले असून शहरातील बंदोबस्तात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.
गर्दीच्या ठिकाणी दहशतवादी हल्ला होण्याची अधिक शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मंगळवारी मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनवर पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर सराव कवायती करण्यात आल्या. यामध्ये रेल्वे पोलीस, आरपीएफ जवान, शहर पोलीस, अग्निशमन दल, बॉम्ब शोधक पथक आणि श्वान पथक सहभागी झाले होते. लोकमान्य टिळक टर्मिनस नेहमीच प्रवाशांनी गजबजलेला असते. त्यामुळे येथे घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दहशतवादी हल्ला झाल्यास त्याचा सामना कसा करायचा, सर्वसामान्य नागरिकांना घटनास्थळावरून सुरक्षितपणे कसे बाहेर काढायचे याबाबतचा सराव यावेळी करण्यात आला.