‘नासा’ या जगप्रसिध्द अवकाश संशोधन संस्थेमार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या ‘मून बग्गी रेस’मध्ये यावर्षी मुंबईतील पाच महाविद्यालयीन तरुणांनी प्रवेश मिळविला आहे. या पाच तरुणांमध्ये एका टपाल कर्मचाऱ्याचा मुलगा आहे. अमेरिकेतील ‘अ‍ॅलाबामा’ या शहरात २५ एप्रिल ते २७ एप्रिल होणाऱ्या स्पर्धेत हे पाच तरूण चंद्रावर चालू शकणाऱ्या गाडीचे प्रात्यक्षिक दाखविणार आहेत.
अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या विलेपार्ले येथील मुकेश पटेल स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अ‍ॅन्ड इंजिनिअरिंग या महाविद्यालयातील हे तरूण आहेत. विना इंधन, कमी वजनाची, कमी आकाराची आणि किमान दोन माणसे बसतील अशा प्रकारची चंद्रावर चालेल, अशी गाडी बनविण्याचे आव्हान या वर्षीच्या स्पर्धेत तरूणांसमोर ठेवण्यात आले आहे. उन्नती थापर, श्री खेबडे, सागर व्होरा, करण शाह आणि अमी दोशी यांनी तयार केलेली मून बग्गी स्पध्रेत सहभागी करून घेण्यात आली आहे. या तरुणांपैकी श्री हा सामान्य घरातील आहे. त्याचे वडील जीपीओ येथे टपाल कर्मचारी आहेत. फोर्टमधील एका चाळीत १८० चौरस फुटाच्या घरात तो राहतो.
या पाच जणांच्या ‘टेक्नो वेटर’ या ग्रुपने दोन व्यक्ती बसतील, अशा स्वरूपाची मून बग्गी बनविली आहे. साधारणत: आठ बाय चार फूट आकाराची ही बग्गी असून तिचे वजन फक्त ७० किलो ग्रॅम आहे. ही बग्गी बनविण्यासाठी या तरूणांना सुमारे दीड लाख रूपये खर्च आला.