इंडिया आघाडीची बैठक आज मुंबईत होत आहे. या बैठकीनिमित्त देशभरातील नेते मुंबईत दाखल होत असून त्यांच्यासाठी पंचपक्वनांची आरास करण्यात आली आहे. तर, दुसरीकडे या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी या बैठकीवर टीका केली आहे. एकीकडे दुष्काळ जाहीर करा सांगणाऱ्या महाविकास आघाडीकडून पाहुण्यांसाठी ग्रॅण्ड हयातमध्ये सोय केली जात असल्याची टीका उदय सामंतांसह अनेक नेत्यांनी केली आहे. यावरून, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टिकास्र सोडलं आहे.

जितेंद्र आव्हाड ग्रॅण्ड हयात हॉटेलवर पोहोचताच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, “५० खोक्यांचा हिशोब द्या आधी. मग बाकीचं विचारा. आमच्या पटणा, बँगलोर येथील बैठकांचं मिळूनही ५० खोके होत नाही. त्यामुळे आधी ५० खोक्यांचा हिशोब द्या.”

हेही वाचा >> “इंडिया’च्या बैठकांवर पैशांची उधळपट्टी”, भाजपाच्या टीकेवर आदित्य ठाकरे म्हणाले, “सुरत-गुवाहाटीचा…”

दरम्यान, मुंबईत ठिकठिकाणी लावलेले पोस्टर्स मुंबई महापालिकेने हटवले आहेत. यावरूनही जितेंद्र आव्हाड यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांच्यावर निशाणा साधला. “मुंबई पालिका आणि पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांचे अभिनंदन करतो की त्यांनी आमचे फोटो आणि पोस्टर्स ज्या तप्तरतेने काढले आहेत, तसंच, हाजीअलीला लागलेले पोस्टर्ट आणि झेंडे काढले असते तर बरं झालं असतं.”

“इंडिया आघाडीबाबत जनतेमध्ये प्रचंड उत्साह दिसतोय. त्यांच्यात प्रचंड आपलेपणा आहे. यामुळे या गोष्टीला काऊंटर करण्याकरता विरोधी पक्ष काही ना काही करणार. आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत. या लोकशाहीत आम्ही कोणाचे पोस्टर फाडत नाहीत. सरकारी यंत्रणा वापरून पोस्टर्स काढायला लावत नाहीत”, असा पलटवारही त्यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आदित्य ठाकरेंची टीका

आमदार आदित्य ठाकरे यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, त्यांनी (शिंदे गट आणि भाजपा) आधी सांगावं की सुरतचा खर्च कोणी केला होता? गुवाहाटीचा खर्च कोणी केला होता? चार्टर्ड प्लेनचा खर्च कोणी केला होता? आमदारांना प्रत्येकी ५० खोके दिले त्याचा खर्च कोणी केला होता? या प्रश्नांची उत्तरं त्यांनी द्यावी. त्यांनी आमची दसऱ्याची सभा ढापण्याचा प्रयत्न केलेला. त्यावेळी असं ऐकलं की सभेला लोकांना आणण्यासाठी एसटीला १० कोटी रुपये दिले होते. कुठलाही पक्ष अस्तित्वात नसताना हे पैसे कुठून आले? हा सरकारी तिजोरीतून केलेला खर्च होता का? कोणाच्या खिशातून किंवा खोक्यातून हा खर्च केला होता?