मुंबई : शहर आणि उपनगरांमधील अगदी गल्लीबोळातही सुरू असलेली काँक्रिटीकरणाची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण न झाल्याने आता रस्त्यावरील अडथळ्यांची शर्यत अधिकच खडतर झाली आहे. महानगरपालिकेने पावसाळ्याची चाहूल लागताच काँक्रिटीकरणाची कामे थांबवली असून अपूर्ण कामांमुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यातच पहिल्याच मुसळधार पावसाने रस्त्यांवर खड्डे अवतरले आहेत.

मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात खड्ड्यांची समस्या निर्माण होते. अनेक भागात खड्ड्यांमुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण होते. गतवर्षी खड्डे बुजवण्यासाठी महानगरपालिकेने १५५ कोटी रुपये खर्च केले होते. यंदाही या कामासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. महानगरपालिकेने यापूर्वी खड्डे बुजवण्यासाठी हॉट मिक्स, कोल्ड मिक्स, जिओ पॉलिमर आदी विविध पर्यायांची चाचपणी केली होती. मात्र, यंदा गतवर्षीप्रमाणेच मास्टिक अस्फाल्टने म्हणजेच डांबराने खड्डे बुजवण्याचे नियोजन पालिकेने केले आहे. मात्र, रस्त्यांवरील खड्डे कायम आहेत.

मुंबईत आतापर्यंत खोदकाम केलेल्या सात परिमंडळात मिळून एकूण १ हजार ३८५ रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. परिमंडळ ४ मध्ये सर्वाधिक म्हणजेच ३७७ रस्त्यांच्या पिक्यूसीची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र असे असले तरीही पावसामुळे अनेक रस्त्यांचे काँक्रिटीकरणाचे काम अपूर्ण राहिले आहे. अपूर्ण कामांमुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी रस्ते तात्पुरते चालण्यायोग्य करण्याचे आदेश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले होते. मात्र, अद्यापही अपूर्ण राहिलेल्या रस्त्यांकडे पालिकेचे लक्ष गेलेले नाही. रस्ते समतल नसल्यामुळे अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अपूर्ण रस्त्यांवरील चर योग्यरीत्या भरण्यात आलेले नाहीत. तसेच, मालाड, गोरेगाव, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, शीव, धारावी, कुर्ला आदी भागांतील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. वर्सोवा येथील जे. पी मार्ग, मार्वे मार्ग, लिंक रोड, जेव्हीएलआर मार्गावरील खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग कमी झाला आहे तसेच प्रवाशांच्या सुरक्षेचाही मुद्दा निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी उखडलेल्या पेव्हर ब्लॉकमुळे पादचाऱ्यांना चालताना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी महानगरपालिकेने कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे. तसेच, मागील आठवड्यापासून खड्डे बुजवण्याच्या कामांना सुरुवात झाली आहे, अशी माहिती महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.