मुंबई : परळ येथील १२५ वर्षांहून अधिक जुना प्रभादेवी पूल शुक्रवारी रात्रीपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. परिणामी, प्रभादेवी पुलावरून धावणाऱ्या बेस्ट बसच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.सागरी मार्गाने वरळीवरून अटलबिहारी वाजपेयी शिवडी – न्हावा शेवा अटल सेतूवर जाणे सोयीचे व्हावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) वरळी-शिवडी उन्नत मार्ग बांधत आहे. हा रस्ता प्रभादेवी पुलावरून जाणार आहे.

परंतु, प्रभादेवी पुलाची दूरवस्था आणि त्याची वयोमर्यादा लक्षात घेऊन तो पाडून त्याच्या जागी नवीन पूल बांधण्यात येणार आहे. प्रभादेवी पूल हा दक्षिण मुंबईतील अत्यंत महत्त्वाचा आणि रहदारीसाठी उपयुक्त असा पूल होता. परंतु, आता पूल बंद केल्याने प्रवाशांना पर्यायी मार्गाने पूर्व-पश्चिम प्रवास करावा लागणार आहे. काही दिवसांवर नवरात्रोत्सव सुरू असल्याने प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. तसेच अनेक रुग्णांना प्रवास करणे कठीण होणार आहे.

या क्रमांकाच्या बेस्ट बसच्या मार्गात बदल

बेस्ट बस मार्ग क्रमांक ए- १६२ प्रभादेवी पुलाऐवजी मडकेबुवा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, कृष्ण देसाई चौक (भारत माता), संत जगनाडे चौक, साने गुरुजी मार्ग, कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य चौक, ना. म. जोशी मार्ग, दीपक सिनेमा, परळ एसटी आगार मार्गे धावेल.

बेस्ट बस मार्ग क्रमांक १६८ प्रभादेवी पुलाऐवजी मडके बुवा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, कृष्ण देसाई चौक (भारत माता), संत जगनाडे चौक, साने गुरुजी मार्ग, कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य चौक, ना.म.जोशी मार्ग, दीपक सिनेमा, पांडुरन बुधकर मार्गे धावेल.

बेस्ट बस मार्ग क्रमांक ए- ११७ प्रभादेवी पुलाऐवजी मडकेबुवा चौकातून वळण घेऊन हिंदमाता सिनेमापर्यंत बस सेवा विस्तारित केली आहे.

बेस्ट बस मार्ग क्रमांक २०१ प्रभादेवी पुलाऐवजी परळ एसटी आगार / संत रोहिदास चौक येथून वळविण्यात येईल.

प्रभादेवी पुलाच्या पाडकामासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे संयुक्तपणे कामकाज पाहणार आहे. पुलाच्या पाडकामासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेला ब्लाॅक घ्यावा लागणार आहे. त्यासाठी ब्लाॅक घेण्याचे नियोजन आहे. पुलाचे पाडकाम अंदाजे दोन महिने सुरू राहील. त्यानंतर नवीन पुलाच्या बांधकामाला सुरुवात केली जाईल. नवीन पुलाचे बांधकाम करण्यासाठी एक वर्ष ४ महिन्यांचा कालावधी लागणार आहे.