मुंबई : प्रभादेवी पुलाचा तिढा आता लवकरच सुटणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि शिवडी-वरळी उन्नत रस्ता प्रकल्पातील बाधित यांची महत्त्वपूर्ण सोमवारी बैठक पार पडली. ही बैठक सकारात्मक ठरली असून नगरविकास विभागाकडून आठवड्याभरात १९ इमारतींच्या समूह पुनर्विकासासंबंधीचा शासन निर्णय प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. हा शासन निर्णय म्हणजे रहिवाशांसाठी लेखी आश्वासन असणार आहे. त्यामुळे, पुलाला असलेला विरोध आता लवकरच दूर होऊन पुलाच्या पाडकामाच्या कामास सुरुवात होण्याची शक्यता आहे.

अटल सेतूला जोडणारा शिवडी-वरळी उन्नत रस्ता प्रभादेवी पुलावरुन जाणार आहे. हा पूल जुना झाल्याने आणि त्याची दुरवस्था झाल्याने एमएमआरडीएकडून येथे द्वि्स्तरीय पूल बांधला जाणार आहे. यासाठी येथील दोन इमारती बाधित होणार आहेत. तर पुला लगतच्या १७ इमारतींना काही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या १९ इमारतींतील रहिवाशांनी पुलाच्या पाडकामास विरोध करत आंदोलन तीव्र केले आहे. त्यामुळेच २५ एप्रिलला वाहतुकीसाठी बंद होणारा प्रभादेवी पूल अद्यापही बंद झालेला नसून द्विस्तरीय पुलाच्या कामाला पर्यायाने उन्नत रस्त्याच्या कमाला विलंब होत आहे. यामुळे एमएमआरडीएला आर्थिक नुकसानही सहन करावे लागत आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १९ इमारतींचा एकत्रित पुनर्विकास तिथेच करण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, या निर्णयानंतरही रहिवाशांचा प्रभादेवी पूल बंद करण्याला आणि त्याचे पाडकाम करण्यास विरोध आहे. आम्हाला लेखी आश्वासन द्या आणि प्रकल्पात थेट बाधित होणाऱ्या दोन इमारतींतील रहिवाशांना तात्पुरती प्रभादेवी परिसरात किंवा आसपासच तात्पुरते गाळे संक्रमण शिबिरातील गाळे म्हणून द्या, अशी मागणी या रहिवाशांनी उचलून धरली आहे.

या सर्व बाबी लक्षात घेऊन महानगर आयुक्त डाॅ. संजय मुखर्जी यांनी पुढाकार घेतला आणि सोमवारी, एमएमआरडीए मुख्यालयात रहिवाशांची बैठक घेतली. या बैठकीत रहिवाशांच्या मागणीवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी डाॅ मुखर्जी यांनी १९ इमारतींच्या समूह पुनर्विकासाच्या निर्णयासंबंधीचा अंतिम निर्णय लवकरच राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडून जारी होईल, असे आश्वासन दिले. त्याचवेळी हाजी नुरानी आणि लक्ष्मी निवासमधील रहिवासी कोणत्याही परिस्थितीत कुर्ल्यातील संक्रमण शिबिरात जाणार नाहीत, अशी भूमिका मांडल्याची माहिती रहिवासी मुनाफ ठाकूर यांनी दिली.

यावर एमएमआरडीएने घरभाड्याचा पर्याय ठेवला. मात्र, घरभाड्याऐवजी प्रभादेवी आणि दादरमध्ये म्हाडाच्या मालकीचे अनेक प्रकल्पबाधितांसाठीचे गाळे आहेत ते गाळे रहिवाशांना संक्रमण शिबिरातील गाळे म्हणून द्यावेत, अशी मागणी रहिवाशांनी ठेवली. यावर म्हाडाकडे यासाठी मागणी करण्याचे आश्वासन एमएमआरडीएने दिल्याचेही ठाकूर यांनी सांगितले. एकोणीस इमारतींच्या समूह पुनर्विकासाचा शासन निर्णय जाहीर झाला आणि दोन इमारतीतील रहिवाशांना प्रभादेवी-दादर परिसरात संक्रमण शिबिराचे गाळे दिले गेले तर आमचा पुलाच्या कामाला विरोध करण्याचा प्रश्नच उरत नाही, असे ठाकूर म्हणाले. एकूणच सोमवारची बैठक सकारात्मक ठरली असून लवकरच प्रभादेवी पुलाचा तिढा सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.