प्रकाश आंबेडकर यांची घोषणा; कर्नाटकची निवडणूक देशाचे भविष्य ठरवेल
आताच्या भीमा-कोरेगाव दंगलीचा सूत्रधार मिलिंद एकबोटे याच्यावर मोकाअंतर्गत कारवाई करावी असा प्रस्ताव पोलिसांनी २००१ मध्ये राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार असताना गृहविभागाला दिला होता. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व तत्कालीन गृहमंत्र्यांनी एकबोटे यांच्यावर कारवाई होऊ दिली नाही. त्यामुळे मिलिंद एकबोटेसारख्या प्रवृत्तींना संरक्षण देणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेससह युती करायची नाही, असा ठराव आम्ही कार्यकर्ता-पदाधिकारी मेळाव्यात केल्याचे भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी जाहीर केले. डाव्या पक्षांशी आम्ही युती करू, असेही ते म्हणाले.
भारिप-बहुजन महासंघाच्या कार्यकर्ता-पदाधिकारी मेळाव्याचा समारोप रविवारी झाला. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी भीमा-कोरेगाव दंगलीचे सूत्रधार असलेल्या मिलिंद एकबोटे यांना शरद पवार यांनीच पूर्वी संरक्षण दिल्याची टीका केली. संभाजी भिडे हेही राष्ट्रवादीच्या नेत्यांचे जवळचे असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. आज कोण काय बोलतो यापेक्षा कागदपत्रे काय म्हणतात हे महत्त्वाचे. आम्ही कागदपत्रांवर विश्वास ठेवायचे ठरवले आहे. एकबोटेंवर कारवाई होणार होती पण राजकीय कारणास्तव ती थांबली हे कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे. पवार यांनी हिंदुत्ववादी नेत्यांच्या दबावामुळे एकबोटेला संरक्षण दिले. त्यामुळे जातीयवादी शरद पवार व राष्ट्रवादी कॉंग्रेसशी युती करणार नाही. आम्ही डाव्या पक्षांसोबत जाऊ, असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
कर्नाटकातील निवडणूक ही देशाचे राजकीय भवितव्य ठरवणार आहे. जो पक्ष कर्नाटकातील निवडणुका जिंकेल तोच पुढील लोकसभा निवडणुकीत यशस्वी होऊन केंद्रात सरकार स्थापन करेल, असे भाकीतही त्यांनी वर्तवले आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी त्यांचे हिंदू महासभेशी काय नाते आहे, हे जाहीर करावे, असे आव्हानही दिले. गुजरातमधील राज्यसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे अहमद पटेल यांना राष्ट्रवादीने मते दिली नव्हती. त्यामुळे कॉंग्रेसने राष्ट्रवादीशी युती केली नाही. अजूनही कॉंग्रेसने त्याबाबतचा निर्णय घेतलेला नाही. महाराष्ट्रात फक्त शरद पवार-अशोक चव्हाण यांच्या पातळीवर बोलणी सुरू आहेत, असेही आंबेडकर यांनी नमूद केले.
आधार, जीएसटी या दोन्ही कॉंग्रेसच्या देणग्या आहेत. भाजपाने केवळ त्यांची अंमलबजावणी केली. आधार हे तर ठार मारण्याचा परवानाच (लायसेन्स टू किल) असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला.
आंबेडकरांचा आरोप बिनबुडाचा – नवाब मलिक</strong>
आंबेडकर यांनी कोणत्या पक्षासोबत जावे हा त्यांचा अधिकार आहे. पण शरद पवार यांनी मिलिंद एकबोटे यांना वाचवले हा त्यांचा आरोप बिनबुडाचा आहे. शरद पवार कधीच कोणत्याही मंत्र्याच्या कामात हस्तक्षेप करत नाहीत. जर त्यांनी हस्तक्षेप केला असता तर तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना अटक केली नसती. १९९९ ते २००४ च्या लोकशाही आघाडी सरकारमध्ये प्रकाश आंबेडकर सहभागी होते. त्यांच्या मंत्र्यांनी हा प्रश्न त्यावेळी का उपस्थित केला नाही? किंवा लोकशाही आघाडीच्या कोणत्याही बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला होता का? भाजप, शिवसेना आणि पुरोगामी विचारांच्या पक्षापैकी आपला पहिला शत्रू कोण? हे त्यांना ठरवावे लागेल, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.
‘करात यांनी भूमिकेचा फेरविचार करावा’
काँग्रेसशी आघाडी न करण्याच्या भूमिकेचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्रकाश करात यांनी फेरविचार करावा, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले आहे. भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही काँग्रेसविरोधी भूमिका घेऊ नये, अशी सूचना चव्हाण यांनी केली.