या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

महालक्ष्मी रेसकोर्सवर जागतिक दर्जाचे आकर्षण ठरणारे ‘थीम पार्क’ उभारण्यासाठी शिवसेना आणि आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेतला असताना दादरमधील मोक्याच्या विस्तीर्ण जागेत ज्येष्ठ भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारलेल्या ‘प्रमोद महाजन कला पार्क’ची दुरवस्था झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापालिका आयुक्त यांच्यासह मान्यवरांनी उद्घाटनाच्या वेळी लावलेली झाडे जळून गेली असून, महाजन यांचे नाव उद्यानास असल्याने सत्ताधारी शिवसेनेकडून उद्यान विकसित करण्यासाठी निधी उपलब्ध होत नाही. नवीन विकास आराखडय़ातही उद्यानाची जागा मलनिसारण विभागाच्या उदंचन केंद्रासाठी दर्शविण्यात आली असून पालिकेच्या दुर्लक्षामुळे हे उद्यान म्हणजे भिकारी, गर्दुल्ले व रिकामटेकडय़ा मंडळींचे आश्रयस्थान बनले आहे.

गेल्या वर्षी प्रमोद महाजन यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी म्हणजे ३ मे रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्यानाचे उद्घाटन झाले. मलनिसारण विभागाच्या सुमारे ११ एकर जागेत उभारण्यात आलेले हे उद्यान बंगलोर किंवा अन्य शहरांमधील उद्यानांप्रमाणे विकसित करण्यात येईल, देशविदेशातील दुर्मीळ वनस्पती, झाडे तेथे असतील, वनस्पतीविषयक प्रदर्शने भरविण्यात येतील आणि महाजन यांच्या नावाला साजेसे हे उद्यान पर्यटकांचे जागतिक आकर्षण ठरेल, असे नियोजन होते. स्लाइड शो, रंगीबेरंगी कारंजी आदी उभारण्याचे ठरविण्यात आले होते. महाजन यांची मुलगी खासदार पूनम महाजन यांनीही खासगी कंपन्या व उद्योगपतींकडून सीएसआरच्या माध्यमातून निधी उभारून सुशोभीकरण करण्यात येईल, असे सांगितले होते. पण त्यांनीही उद्यानाकडे फारसे लक्ष दिलेले नाही.

या उद्यानाकडे शिवसेना-भाजप आणि प्रशासन यापैकी कोणाचेही सध्या लक्ष नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी दादर, शिवाजीपार्क परिसरात जागेचा शोध सुरू होता आणि शिवाजी पार्कमध्ये मोठे उद्यान विकसित करणे शक्य झालेले नाही. शिवसेनेला अपेक्षित असलेले सुंदर उद्यान येथेही विकसित करता येऊ शकते. पण महाजन यांचे नाव असल्याने दुर्लक्षित असलेली दादरमधील उद्यानाची मोक्याची जागा महापालिकेचे २५ कोटी रुपये खर्च होऊनही अक्षरश फुकट जात आहे. महाजन यांच्या निधनानंतर तत्कालीन नगरसेवक चंद्रकांत पुगांवकर यांच्या प्रयत्नांमुळे या उद्यानासाठी महाजन यांचे नाव देण्यात आले असले, तरी जागतिक दर्जाचे तर सोडाच पण देशात किंवा मुंबईतही नाव होईल, असा विकास करण्यासाठी महापालिकेने पावले उचललीच नाहीत. उपमहापौर अलका केरकर यांनी डिसेंबर महिन्यात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आणि उद्यानाची पाहणी करून दुरवस्था पाहिली व सूचना दिल्या.

  • भिकारी, गर्दुल्ले व रिकामटेकडय़ांचा वावर
  • उद्यानात मुलांचे क्रिकेट, फुटबॉल
  • महाजन यांच्या नावामुळे शिवसेनेला रस नाही
  • पर्यटकांसाठी उपाहारगृह व अन्य सुविधा नाहीत
  • पुरेसे रखवालदार नाहीत, स्वच्छतागृहाचा झोपडपट्टीवासीयांकडून वापर
  • कुंपणाची पडलेली थोडी भिंतही दुरुस्त नाही
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pramod mahajan art park not in good condition
First published on: 13-01-2016 at 04:22 IST