लांब पल्ल्याच्या गाडीतून प्रवास करताना पाण्याच्या बाटलीपासून जेवणाच्या पाकिटापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी छापील किमतीपेक्षा जादा पैसे मोजावे लागणाऱ्या प्रवाशांना दिलासा देण्याची योजना रेल्वेने आखत आहे. या योजनेद्वारे प्रवाशांना प्रवासाआधीच कूपन्स विकत घेता येणार आहेत. या कूपन्सवर पाण्याच्या बाटलीचे, खाद्यपदार्थाचे आदी दर छापलेले असतील. गाडीतील खानपान सेवा कर्मचाऱ्याला पैशांऐवजी ही कूपन्स देऊन प्रवाशांना वस्तू खरेदी करता येतील. याबाबतची योजना अद्याप तयार झालेली नसली, तरी येत्या दोन-तीन महिन्यांत ही कूपन्स प्रवाशांच्या हाती येतील.
प्रवाशांच्या सोयीसाठी लांब पल्ल्याच्या गाडय़ांमध्ये खानपान सेवा चालवली जाते. राजधानी, दुरंतो, शताब्दी अशा गाडय़ांमध्ये ही सेवा आयआरसीटीसीतर्फे पुरवण्यात येते. त्याव्यतिरिक्त इतर गाडय़ांमध्ये त्यासाठी कंत्राटदार नेमले आहेत. मात्र या कंत्राटदारांकडे काम करणारे कर्मचारी प्रवाशांकडून ठरावीक किमतीपेक्षा जास्त पैसे घेत असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत. १२ ते १५ रुपयांच्या पाण्याच्या बाटलीसाठी २० रुपये, १० रुपयांच्या वेफर्सच्या पाकिटासाठी १५ रुपये, जेवणाच्या थाळीसाठी ७५-८० रुपयांऐवजी १०० ते १२० रुपये असा जादा आकार प्रवाशांकडून घेतला जातो.
प्रत्येक गाडीतील कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांवर आणि त्या कंत्राटदारावर कारवाई करून ही लूट थांबवणे रेल्वेला शक्य नाही. तसेच ते व्यवहार्यही नाही. त्यामुळे आता रेल्वे त्याबाबत वेगळाच उपाय शोधत आहे. या उपायानुसार प्रवाशांच्या हाती प्रवास सुरू करण्याआधीच प्रत्येक वस्तूच्या मूल्याची कूपन्स देण्यात येणार आहेत. ही कूपन्स प्रवाशांना अर्थातच पैसे देऊन विकत घ्यावी लागतील. प्रवासादरम्यान प्रवाशांना कोणत्याही गोष्टीची गरज भासल्यास ही कूपन्स देऊन त्या-त्या वस्तू पैसे न देता प्रवाशांना थेट घेता येतील, असे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद यांनी सांगितले.
मात्र, ही कूपन्स इतर कोणीही तयार करू नयेत किंवा कंत्राटदारानेच बोगस कूपन्स छापू नयेत, यासाठी काय खबरदारी घ्यावी लागेल, याबाबत रेल्वे विचार करत आहे, असेही ब्रिगेडिअर सूद यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे प्रवासादरम्यान प्रवाशांकडील कूपन्स संपली आणि त्यांना जादा कूपन्स हवी असतील, तर त्यांचा पुरवठा कसा करता येईल, यासाठीही प्रणाली उभारणे आवश्यक आहे. त्याबाबतचे कामही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच प्रवाशांच्या सेवेत ही कूपन्स येतील. त्यामुळे प्रवाशांची प्रवासादरम्यानची लूट थांबणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.