मुंबई : हिंदी दूरचित्रवाणीवरील ‘रामायण’ या प्रसिद्ध मालिकेचे निर्माते रामानंद सागर यांचे पुत्र प्रेम सागर यांचे वृद्धापकाळाने रविवार, ३१ ऑगस्ट रोजी निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर मुंबईतील जुहू येथील पवन हंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

भारतीय चित्रपटसृष्टी आणि हिंदी दूरचित्रवाणीवरील अनुभवी निर्माते असलेले प्रेम सागर हे उत्तम सिनेमॅटोग्राफरही होते. त्यांनी पुणे येथील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हणजेच ‘एफटीआयआय’ येथे छायाचित्रण आणि सिनेमॅटोग्राफीचे धडे गिरविले होते. प्रेम सागर हे ‘एफटीआयआय’च्या १९६८ च्या तुकडीचे विद्यार्थी होते. तसेच वडिलांनी स्थापन केलेल्या ‘सागर आर्ट्स’ या निर्मितीसंस्थेच्या महत्वपूर्ण प्रकल्पांमध्ये त्यांनी काम केले आणि भारतीय मनोरंजनसृष्टीतील सागर कुटुंबियांचा वारसा पुढे नेण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली.

प्रेम सागर यांनी ‘विक्रम और बेताल’ मालिकेची निर्मिती करीत दिग्दर्शनाचीही धुरा सांभाळली. याशिवाय त्यांनी ‘काकभुशुंडी रामायण’ आणि ‘कामधेनु गोमाता’ यांसारख्या मालिकेच्या निर्मितीसाठी काम केले. भारतीय मनोरंजनसृष्टीच्या तांत्रिक विश्वात त्यांनी विशेष नावलौकिक प्राप्त केला होता. प्रेम सागर यांनी १९६८ च्या आंखें आणि १९७२ च्या ललकार या चित्रपटासाठी कॅमेरा आणि इलेक्ट्रिकल विभागात काम केले होते, तर १९७६ साली प्रदर्शित झालेल्या ‘चरस’ चित्रपटासाठी सिनेमॅटोग्राफर म्हणून धुरा सांभाळली होती.