विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर आज संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली आहे. राजगृहाच्या काचांवर दगडफेक करण्यात आली आहे. तसंच घरातील कुंड्यांचंही मोठं नुकसान झालं आहे. ANI ने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. या ठिकाणी पोलीस दाखल झाले असून सदर प्रकरणाची पुढील चौकशी सुरु आहे. राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी या ठिकाणी भेटीला येतात. अत्यंत महत्त्वाचं असं हे स्थान आहे ज्या ठिकाणी आज तोडफोड करण्यात आली.

पोलिसांना आंबेडकर कुटुंबीयांनी घटनेचे सीसीटीव्ही फुटेज दिले आहे. आरोपींचा शोध तातडीने घ्यावा आणि त्यांना अटक करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी नोंदवला निषेध

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे. राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. आम्हा आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे. राजगृहावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो आणि गृहमंत्र्यांना विनंती करतो की या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. तसेच आरोपींंना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी. अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन केली आहे.

 

प्रकाश आंबेडकर यांनी केलं शांतता राखण्याचं आवाहन

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सर्व आंबेडकरवाद्यांनी शांतता राखावी असं आवाहन केलं आहे. “मी सगळ्यांना व्हिडीओद्वारे आवाहन करतो आहे की सगळ्या आंबेडकरवाद्यांनी शांतता राखावी, ही गोष्ट खरी आहे की राजगृहावर दोघेजण आले त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा आणि इतर गोष्टी तोडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घातलं. पोलिसांनी त्यांचं कर्तव्य केलं. राजगृहाच्या आजूबाजूला आंबेडकरवाद्यांनी जमू नये, पोलीस त्यांचं काम करत आहेत. आपण सगळ्यांनी शांतता राखावी” असं  प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

नाना पटोलेंनी नोंदवला निषेध

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह या निवासस्थानी समाजकंटकांनी जी तोडफोड केली त्याचा मी निषेध करतो असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. त्याप्रकरणी पोलीस आता पुढील तपास करत आहेत. दरम्यान आंबेडकर अनुयायांना शांत राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.