मुंबई : फेब्रुवारीच्या मध्यापासून वाढत असलेल्या करोनामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य सरकारला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने शनिवारी राज्यातील सर्व रुग्णालय प्रमुखांची दृकश्राव्य माध्यमातून बैठक घेऊन त्यांना सज्ज राहण्याचे आदेश दिले.

राज्यातील सर्व रुग्णालय प्रमुखांच्या घेतलेल्या बैठकीत रुग्णालयात सध्या उपलब्ध असलेल्या खाटा आणि रुग्णांसाठी वापरात असलेल्या खाटा यांची माहिती संकलित करावी. उपलब्ध प्राणवायूच्या साठ्याची माहिती घ्यावी, रुग्णालयात करण्यात येणाऱ्या करोना चाचण्यांचे अहवाल संकेतस्थळावर अपलोड करावे, प्राणवायू सिलिंडर, पीएसए प्रकल्प, द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू, जीवन रक्षक प्रणाली, औषधांचा साठा, महिला आणि मुलांसाठी विशेष कक्षाची सुविधा, लसीकरणाची माहिती आणि करोना संदर्भातील अन्य स्वरुपातील माहिती संकेतस्थळावर अद्ययावत करण्यात यावी, अशा स्वरुपाच्या सूचना आरोग्य विभागाकडून राज्यातील सर्व रुग्णालय प्रमुखांना देण्यात आल्या आहेत. तसेच करोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयाने आवश्यक असलेली औषधे आणि उपकरणे यांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना द्यावी. ती औषधे आणि उपकरणे पुरविण्यासंदर्भात जिल्हाधिकऱ्यांना सूचना दिल्या असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले.

हेही वाचा – ‘‘अदानी’बाबत शरद पवार यांचा पुनरुच्चार; न्यायालयाची समितीच प्रभावी!

हेही वाचा – मोघरपाडा कारशेडच्या कामाचे कंत्राट एसईडब्ल्यू इन्फ्रा-विश्व समुद्र इंजिनियरिंगकडे? आर्थिक निविदेत सर्वात कमी बोली

मुखपट्टी वापरणे आवश्यक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रुग्णालयातील प्रत्येक व्यक्तीला मुखपट्टी वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. डॉक्टर, परिचारिका, कक्ष सेवक यांच्यासह तृतीय श्रेणी कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी या सर्वांना मुखपट्टी वापरणे आवश्यक असल्याचा सूचनाही रुग्णालय प्रमुखांना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे रुग्णालयामध्ये तापाच्या रुग्णांसाठी स्वतंत्र बाह्य रुग्ण विभाग सुरू करावा आणि प्राणवायूच्या दोन जम्बो सिलिंडरचा साठा करावा अशा सूचनाही दिल्या आहेत.