तंजावर विद्यापीठाच्या तज्ज्ञांकडून कामाला सुरुवात; चार हजार पाने, छायाचित्रांचा समावेश

मुंबई : पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरुजी यांची मूळ हस्तलिखिते, कागदपत्रे, छायाचित्रे यांचे जतन आणि संवर्धन करण्याचे काम सुरु झाले आहे. तंजावर विद्यापीठातील दोन तज्ज्ञांकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन या सर्व मूळ हस्तलिखितांचे आणि कागदपत्रांचे संरक्षण केले जात असून सानेगुरुजी राष्ट्रीय स्मारकाने हा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. सुमारे चार हजार पानांचा यात समावेश आहे.

साने गुरुजी यांची मूळ हस्तलिखिते जमा करण्याचे काम काही वर्षांपूर्वी स्मारकाने हाती घेतले होते. प्रकाश विश्वासराव, त्यांचे सहकारी  यांनी विविध ठिकाणी फिरून गुरुजींची हस्तलिखिते गोळा केली. तर काही साहित्य लोकांकडून मिळाले.

साधना प्रकाशन संस्थेकडे गुरुजींचे बरेचसे अप्रकाशित साहित्य आणि हस्तलिखिते मिळाली. स्मारकाने ही सर्व हस्तलिखिते, कागदपत्रे यांचे स्कॅनिंग करुन त्याच्या सीडी बनवून घेतल्या. त्याच्या झेरॉक्स प्रतीही असून या सगळ्या ऐवजाचे ३० हून अधिक खंड आमच्याकडे आहेत.

आता या सर्व  मूळ हस्तलिखितांचे अत्याधुनिक तंत्र वापरुन जतन-संरक्षण केले जाणार असल्याचे स्मारकाचे सल्लागार गजाजन खातू यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

दुर्मिळ छायाचित्रे        

या हस्तलिखितात साने गुरुजी यांच्या काही दैनंदिनी, छात्रालय या हस्तलिखित दैनिकाचे अंक, त्यांच्या कविता, त्यांनी लिहिलेली सावित्री आणि अन्य एक अशी दोन नाटके, इस्लामी संस्कृती, सानेगुरुजी -आचार्य विनोबा भावे यांच्यातील पत्रव्यवहार, कॉंग्रेस दैनिकाचे अंक आणि दुर्मिळ छायाचित्रांचा समावेश आहे. तंजावर विद्यापीठाचे चंद्रशेखर काटे, सागर पोवार या दोन तज्ज्ञांकडून हे काम सुरु असल्याची माहिती स्मारकाचे व्यवस्थापक सतीश शिर्के यांनी दिली.

जपानी टिश्यू पेपर आणि ग्लोटीन फ्री स्टार्ट पेस्ट, सीएमसी पेस्ट यांच्या मदतीने साने गुरुजी यांच्या मूळ हस्तलिखितांचे जतन आणि संरक्षण करण्याचे काम आम्ही करत आहोत. या कामाला सुरुवात होऊन एक महिना झाला असून येत्या एक ते दीड महिन्यात हे काम पूर्ण होईल. तंजावर विद्यापीठ तसेच नॅशनल मिशन फॉर मन्युस्क्रीप्ट कडून भारतातील जुन्या आणि दुर्मिळ पोथ्या, हस्तलिखिते यांच्या जतनाचे काम काही ठिकाणी सुरु आहे.

– चंद्रशेखर काटे