निशांत सरवणकर

पावणेदोन कोटी रुपयांच्या लाच प्रकरणात पुणे येथील भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक बाळासाहेब वानखेडे हे संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले असतानाही या प्रकरणी भूमी अभिलेख कार्यालयाने फक्त प्राथमिक अहवाल पाठविला आहे. या प्रकरणी राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अहवालाची प्रतीक्षा केली जात असून त्यानंतरच कारवाई करण्याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

वानखेडे यांच्या नियुक्तीसाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता‘ने प्रसिद्ध केले. या वानखेडे यांच्यासाठी आठवलेच नव्हे तर खासदार उदयनराजे भोसले यांनीही शिफारस करणारे पत्र ८ जून २०१८ रोजी दिले होते. मात्र हे पत्र रद्द करून उदयनराजे भोसले यांनी औरंगाबाद भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक सतीश भोसले यांची नियुक्ती करण्याचे पत्र दिले होते. ही पत्रे पुण्याचे जिल्हा अधीक्षक किशोर तवरेज यांनी ‘महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणा‘त दाखल केलेल्या याचिकेत जोडण्यात आली आहेत. या याचिकेची प्रत ‘लोकसत्ता‘कडे आहे.

वानखेडे यांना पदोन्नत करून त्यांची नियुक्ती करण्याबाबत सुरुवातीला नागपूर व नंतर अमरावती असा जिल्हा देण्यात आला होता. तसा प्रस्ताव महसूल विभागाने पाठविला होता. परंतु हा प्रस्ताव दोन वेळा बदलण्यात आला. अखेर वानखेडे यांचीच पुणे भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक म्हणून नियुक्ती करण्याबाबत प्रस्ताव पाठविण्यात आला. हा प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाकडून मंजूर करण्यात आला. महसूल विभागाकडून आलेला प्रस्ताव मान्य करण्याइतपतच मुख्यमंत्री कार्यालयाचा संबंध असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. या नियुक्तीशी मुख्यमंत्री कार्यालयाचा काहीही संबंध नाही, असेही या संदर्भात स्पष्ट करण्यात आले आहे.

लाच घेणारे वकील रोहित शेंडे यांचा आणि तक्रारदार यांच्यातील संभाषणात अनेकवेळा ही लाच कोणासाठी घेतली गेली आहे, याचा उल्लेख आहे. शेंडे यांची चौकशी सुरु असल्याचा दावा एसीबीतील संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे.

या प्रकरणी एसीबीचे अधीक्षक संदीप दिवाण यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र लाच कोणासाठी घेतली हे स्पष्ट दिसत असतानाही तसा अहवाल दिला जाऊ नये, यासाठी दबाव आणला जात असल्याचे या घडामोडींशी संबंधित सूत्रांनी सांगितले. महसूल विभागानेही याबाबत अद्याप ‘एसीबी‘कडून अहवाल आलेला नाही, अशी भूमिका घेतली आहे.

कथित सापळा प्रकरणात प्राथमिक माहिती अहवाल पाठविण्यात आला आहे. याबाबत सविस्तर अहवाल अद्याप पाठविलेला नाही. त्यासाठी काही कालावधी लागण्याची शक्यता आहे

– एस. चोकलिंगम, संचालक, राज्य भूमी अभिलेख