पृथ्वीराज चव्हाण यांचा मोदींवर आरोप; मुठभरांच्या फायद्यासाठी निर्णय

रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन हे अजून तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी उत्सुक होते मात्र निश्चलनीकरणाला त्यांचा स्पष्ट विरोध असल्याने त्यांना मोदींनी हटवले, असा आरोप  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी गोरेगाव येथील एका कार्यक्रमावेळी केला. पार्वतीबाई शंकरराव चव्हाण ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात आलेल्या नोटाबंदीचा लाभ कोणाला? या चर्चासत्रात ते व माजी मंत्री जयंत पाटील आदी उपस्थित होते. या चर्चासत्रात त्यांनी व पाटील यांनी निश्चलनीकरणाचा निर्णय चुकीचा असल्याचे ठाम प्रतिपादन केले.

निश्चलनीकरणाचा मोदींनी घेतलेला निर्णय हा त्यांना काही मूठभर उद्योगपतींनी सुचविलेला निर्णय होता. याला रघुराम राजन यांनी विरोध केल्यानेच त्यांना हटवण्यात आले. अर्थमंत्री अरुण जेटलींना हा निर्णय ८ नोव्हेंबरच्या संध्याकाळी ५ वाजताच कळला, त्यामुळे मोदी हे मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार नाही तर हुकूमशाहीनुसार निर्णय घेत असल्याचे सिद्ध होत असल्याचे चव्हाण या वेळी म्हणाले. या निर्णयाला उत्तर प्रदेशच्या निवडणुकांची किनार असून या निवडणुका आता काय डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डवर लढणार आहात का? असा सवालही त्यांनी गमतीने उपस्थित केला. रिझव्‍‌र्ह बँकेने किती पैसे परत आलेत याचे आकडे अद्याप घोषित केलेले नाहीत. सध्याचे गव्हर्नर ऊर्जित पटेल मोदी यांच्या इशाऱ्यावर चालतात, असेही ते म्हणाले.