एका कंपनीचा ‘एमआरव्हीसी’शी पत्रव्यवहार

मुंबई : गेल्या दहा वर्षांपासून चर्चेत असलेल्या सीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद मार्गाची बांधणी खासगी कंपनीमार्फत करतानाच (पीपीपी मॉडेल) याच कंपनीकडून या मार्गावर लोकलही चालवण्यात येईल. यासदंर्भात एका कंपनीने मुंबई रेल्वे विकास महामंडळाशी (एमआरव्हीसी) पत्रव्यवहार केल्याचे आणि या विषयावरून कंपनीसोबत सध्या चर्चाही सुरू असल्याचे सोमवारी झालेल्या खासदारांच्या बैठकीत रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी मुख्यालयात झालेल्या बैठकीत उन्नत प्रकल्पाबरोबरच एमयूटीपीच्या प्रकल्पांसंदर्भातही चर्चा झाली. त्या वेळी एमयूटीपीच्या रखडलेल्या प्रकल्पावरुनही खासदारांनी ‘एमआरव्हीसी’ व मध्य रेल्वेला जाब विचारला.

सीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद मार्ग पूर्ण झाल्यास ७५ मिनिटांचा प्रवास ४५ मिनिटांत करणे शक्य होणार आहे. या प्रकल्पाच्या कामाला  मुर्हूत मिळालेला नाही.

सध्या एमयूटीपी-३ एमधील उन्नत प्रकल्प वेळेत पूर्ण करा आणि हार्बर प्रवाशांना दिलासा देण्याची मागणी खासदारांनी केली. पश्चिम रेल्वेवरील उन्नत प्रकल्प गुंडाळला, किमान हार्बर मार्गावरील प्रकल्प तरी पूर्ण करण्याची मागणी केली असता सीएसएमटी प्रकल्प पूर्ण करणार असल्याचे एमआरव्हीसी व मध्य रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

यासंदर्भात एमआरव्हीसीमधील अधिकऱ्याने एका खासगी कंपनीने पत्रव्यवहार केल्याचे ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. या कंपनीने उन्नत प्रकल्प पूर्ण करण्यात रुची दाखवली आहे. त्यांच्याशी बोलणी सुरू असल्याचे सांगितले.

सीएसएमटी ते पनवेल उन्नत प्रकल्प अद्यापही पूर्ण झालेला नसल्याने त्याबाबत विचारणा केली असता एका खासगी कंपनीने रुची दाखवली असून तेच प्रकल्प पूर्ण करतील व रेल्वेला उत्पन्न मिळण्यासाठी लोकलही तेच चालवतील, असे बैठकीत रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

– राहुल शेवाळे, खासदार