मुंबई : देवनार येथे मोटार वाहन निरीक्षक सचिन पाटील यांचा खासगी वाहनचालक सरकारी गणवेश परिधान करून नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांची छायाचित्रे टिपत असल्याचा प्रकार उघडकीस आला. प्रत्यक्षात ही कारवाई मोटार वाहन निरीक्षकाने करणे अपेक्षित असताना ते स्वत: गाडीत बसून राहिले. त्यामुळे कर्तव्यात कसूर केल्याबद्दल पाटील यांच्यावर काय कारवाई केली जाणार, याविषयी चर्चेला उधाण आले आहे.

संबंधित वाहनचालक कोणत्याही शासकीय, निमशासकीय किंवा कंत्राटी कर्मचारी नाही. तरीही त्याने शासकीय गणवेश परिधान करून, सरकार व सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करत असल्याचे निष्पन्न होत आहे. दरम्यान या प्रकरणी मोटार वाहन निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी मोटार वाहन निरीक्षक सचिन पाटील देवनार येथे गेले होते. यावेळी त्यांनी स्वत: कारवाई करणे अपेक्षित होते. परंतु, ते शासकीय वाहनात बसून राहिले होते. तर, त्यांचा खासगी वाहनचालक वैभव फडतरे हा एका रस्त्यावर वाहनाचे, बसचे छायाचित्र काढत होता. यावेळी एका जागृत नागरिकाने याबाबत फडतरेला विचारणा केली असता, त्याने तेथून काढता पाय घेतला. नागरिकाने सचिन पाटील यांच्याकडे वाहन चालक कारवाईची छायाचित्रे काढू शकतो का, अशी विचारणा केली. तेव्हा पाटील यांनी त्याला छायाचित्रे काढण्यासाठी आम्हीच पाठवल्याचे उत्तरादाखल सांगितले. कारवाई आम्ही करत आहे, तो फक्त छायाचित्र काढत आहे, अशा आशयचा व्हिडीओ समाजमाध्यमावर प्रसारित झाला. परंतु, यातील फडतरे हा खासगी व्यक्ती असूनही त्याने शासकीय गणवेश घातला होता. तसेच, तो शासकीय कारवाई करत होता, अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे खासगी व्यक्तीला शासकीय गणवेश देऊन, त्याला शासकीय कारवाई करण्याच्या सूचना कोणी दिल्या, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

संबंधित वाहनचालक शासनाने भरती केलेला कंत्राटी कर्मचारी आहे. त्याने शासकीय गणवेश घातला. वाहनचालकाला देवनार येथे कारवाईसाठी पाठवले नव्हते. त्याला नियमभंग करणाऱ्या बसचा वाहन क्रमांक पाहण्यासाठी पाठवले होते. यावेळी मी तिथेच शासकीय गाडीत बसलो होतो. – सचिन पाटील, मोटार वाहन निरीक्षक, परिवहन आयुक्त कार्यालय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खासगी व्यक्तीने शासकीय कर्मचाऱ्याचा गणवेश घालून, शासकीय वाहन चालवणे हा मोठा गुन्हा आहे. या प्रकरणी तत्काळ चौकशी करून सत्यता पडताळली जाईल. अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. तसेच याप्रकरणी गुन्हा दाखल केला जाईल. – प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री