मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणारी, अभिनयाच्या विविध छटांमध्ये रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री प्रिया बापट आता एका नव्या आणि थरारक अविष्कारात दिसणार आहे. ॲमेझॉन प्राईमवर लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘अंधेरा’ या भयप्रद वेबमालिकेत ती एका महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. नुकताच या वेबमालिकेचा ट्रेलर समाजमाध्यमांवर प्रदर्शित झाला असून त्याने प्रेक्षकांमध्ये एकाच वेळी भीती आणि उत्सूकता निर्माण केली आहे. या मालिकेच्या निमित्ताने प्रियाने पहिल्यांदाच भयपट शैलीत काम केले असून यात तिने पहिल्यांदाच पोलिसाची भूमिका साकारली आहे.
या अनुभवाबद्दल प्रिया बापट म्हणते, ‘मी पहिल्यांदाच भयपट शैलीतील वेबमालिकेत काम केले आहे आणि हा अनुभव खरोखरच वेगळा ठरला. या मालिकेचं चित्रीकरण बरंचसं रात्रीच्या वेळेस करण्यात आलं आहे. पण या मालिकेची पटकथा इतकी लक्षवेधी होती की काम करताना कुठलंही दडपण वा भीती जाणवली नाही. जेव्हा पटकथा माझ्या हातात पडली, ती पूर्ण वाचली तेव्हा मनाता एकच विचार आला की आजवर मी वाचलेल्या पटकथांपैकी ही उत्तम आहे.
ही कथा फार वेगवेगळ्या पद्धतीने उलगडते आणि म्हणूनच ती अभिनयाच्या दृष्टीने खूपच आव्हानात्मक ठरली. यात ॲक्शनदृश्यं आहेत, भीतीदायक दृश्यं आहेत. त्यामुळे कलाकार म्हणून ही भूमिका करताना एक वेगळीच मजा आली. आतापर्यंत मी राजकारणी, वकील यांसारख्या विविध भूमिका साकारल्या आहेत. मात्र, यात मी पूर्णपणे एका वेगळ्या अवतारात प्रेक्षकांसमोर येणार आहे. मराठीत मला जसं प्रेम मिळालं, तसंच प्रेम मला हिंदी चित्रपट – वेबमालिकांसाठी मिळालं, याचा खूप आनंद आहे. या मालिकेचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा प्रतिसाद बघायला मी प्रचंड उत्सूक आहे’.
‘अंधेरा’चं ट्रेलर पाहून प्रेक्षकांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कथानक काय आहे? हे रहस्य नेमकं कुठं घेऊन जाणार आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहेत.